लग्न मोडण्यापेक्षा केतनची हत्या करणे सोपे वाटले! सियाचे धक्कादायक वक्तव्य; लोहगडावर केला सीन रिक्रिएट

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासाला आता वेग आला आहे. पोलीस आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांची कसून चौकशी करत आहेत. आज दोघांना घटनास्थळी नेऊन पोलिसांनी संपूर्ण घटनेचा सीन रिक्रिएट केला. या वेळी केतन अग्रवालची हत्या नेमकी कशी करण्यात आली याची सविस्तर माहिती तपास पथकाने पडताळून पाहिली. चौकशीदरम्यान सियाने ‘लग्न मोडण्यापेक्षा केतनची हत्या करणे सोपे वाटले,’ असे चक्रावून टाकणारे उत्तर दिले.

तपासाचा भाग म्हणून पोलिसांनी सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांना लोहगडावर आणले. याच ठिकाणी केतन अग्रवालला दरीत कशा प्रकारे ढकलण्यात आले, याचा घटनाक्रम दोघांकडून समजून घेण्यात आला. लोहगड किल्ल्यावरील हत्ती तलावाजवळील दरीत केतनला ढकलल्याचा आरोप या दोघांवर आहे. घटनास्थळी प्रत्यक्ष पाहणी करत पोलिसांनी संपूर्ण सीन रिक्रिएट केला. चौकशीदरम्यान तिने ‘लग्न मोडण्यापेक्षा केतनची हत्या करणे सोपे वाटले,’ असे सांगितल्याचे समोर आले आहे. या कबुलीनंतर तपासाला नवे वळण मिळाले असून पोलिसांकडून या प्रकरणातील विविध पैलूंची पडताळणी सुरू आहे.

लग्न नको म्हणून कट रचल्याचा आरोप

मिळालेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर महिन्यात होणारे लग्न मोडल्यास कुटुंबांच्या भावना दुखावल्या जातील, अशी भावना सियाच्या मनात होती. त्यामुळे लग्न रद्द करण्याऐवजी होणाऱया पतीची हत्या करण्याचा निर्णय घेतल्याचे चौकशीत समोर आल्याचे सांगितले जात आहे. केतन अग्रवालशी लग्न करायचे नसल्याने सियाने तिचा प्रियकर चेतन चौधरी याच्या मदतीने कट रचल्याचा आरोप दोघांवर आहे.

न्यायालयात हजर करणार

आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांची पोलीस कोठडी 29 जून रोजी संपत असल्याने त्यांना उद्या वडगाव मावळ न्यायालयात हजर केले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर उद्या कोर्टात पोलीस आणि बचाव पक्ष यांच्यात जोरदार कायदेशीर लढाई होण्याची शक्यता आहे. सियाचे वकील ऍड. आशुतोष श्रीवास्तव यांनी सांगितले की, माझी अशील सिया गोयल हिने तपासात पोलिसांना पूर्ण सहकार्य केले आहे. सरकारी पक्षाला चौकशीसाठी आणि पुरावे गोळा करण्यासाठी आधीच पुरेसा वेळ मिळाला असून योग्य ती पोलीस कोठडी देण्यात आली होती. त्यामुळे आता पुन्हा पोलीस कोठडी वाढवून मागण्याचे कोणतेही सबळ कारण नाही, या अनुषंगाने उद्या युक्तिवाद करणार असल्याचे ऍड. श्रीवास्तव यांनी सांगितले.

Comments are closed.