'टीम इंडियाची कामगिरी पाहता, वैभवला इंग्लंड दौऱ्यात पहिल्या सामन्यापासूनच खेळवा', दिग्गजाचा संघ व्यवस्थापनाला सल्ला!
भारताचा आयर्लंड दौरा खूपच निराशाजनक आणि धक्कादायक ठरला. या दौऱ्यातील दोन सामन्यांची टी२० मालिका भारताने गमावली. या मालिकेत भारत श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळला आणि १५ जणांच्या संघामध्ये युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीचीही निवड झाली होती, मात्र त्याला पदार्पणाची संधी मिळाली नाही. आता या दौऱ्यानंतर भारत इंग्लंडला रवाना होणार आहे. या दौऱ्यात एक जुलैपासून पाच सामन्यांची टी२० मालिका सुरू होणार आहे. यामध्ये वैभवला पहिल्याच सामन्यापासून खेळवा, असे वक्तव्य भारतीय दिग्गजांनी केले आहे.
आयर्लंडमध्ये भारताने टी२० मालिका ०-२ ने गमावली. संघाची कामगिरी पाहता सुनील गावस्कर यांनी वैभवला इंग्लंडमध्ये भारतासाठी पदार्पण करण्याची संधी देणे आता अत्यावश्यक आहे, असे म्हणत १५ वर्षीय खेळाडूच्या पदार्पणाला पाठिंबा दर्शवला आहे. आयर्लंड दौऱ्यात लयीत असणाऱ्या वैभवला संधी न दिल्याबद्दल गावस्करांनी संघ व्यवस्थापनावर टीका केली आहे. त्यांनी म्हटले, “आयर्लंडमधील मालिका या फलंदाजीतील प्रतिभावान खेळाडूला आजमावून पाहण्याची उत्तम संधी होती.”
“मी गेल्या महिन्याभरापासून हेच सांगत आहे की, वैभव सूर्यवंशीचा फॉर्म पाहता त्याला आयर्लंड दौऱ्यातील दोन्ही सामन्यांमध्ये खेळवायला पाहिजे होते. एका सामन्यात तो अभिषेक शर्मासोबत सलामीला येऊ शकला असता आणि दुसऱ्या सामन्यात अभिषेकला वगळून किंवा त्याला खालच्या क्रमांकावर पाठवून सॅमसनला सलामीला पाठवू शकला असता,” असे गावस्कर म्हणाले.
“वैभव खेळला असता तर भारताने सामना जिंकलाच असता याची खात्री नाही, कदाचित तो पण १०-१५ धावांवर बाद झाला असता. जर तुम्हाला युवा खेळाडूंना संधी द्यायची असेल तर आयर्लंडमधील मालिका त्यांना आजमावून पाहण्याची उत्तम संधी होती,” असेही गावस्करांनी सुचविले.
गावस्कर यांनी आयर्लंडमधील भारताच्या फलंदाजीबद्दलही वक्तव्य केले. ते म्हणाले, “या पराभवानंतर भारताची फलंदाजी कमकुवत दिसत असल्याने इंग्लंडच्या गोलंदाजांवर दबाव आणण्यासाठी आता स्फोटक युवा खेळाडू वैभवला संघात घेणे आवश्यक आहे. आता कोणतेही कारण चालणार नाही. फलंदाजी क्रमामध्ये बदल करावा लागला तरी चालेल, मात्र वैभवला संघात घेतलेच पाहिजे.”
इंग्लंड दौऱ्यातील टी२० मालिकेत वैभवला संधी मिळाली तर तो सचिन तेंडुलकरचा दीर्घकालिन विक्रम मोडून भारतासाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाला सर्वात युवा खेळाडू ठरेल.
Comments are closed.