‘मातोश्री’वरील आमदारांच्या बैठकीत काय झालं? संजय राऊत यांनी दिली संपूर्ण माहिती

अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या ‘मातोश्री’वरील आमदारांच्या बैठकीमध्ये काय झाले याची पूर्ण माहिती शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी बुधवारी मुंबईत माध्यमांशी बोलताना दिली. आमदारांच्या बैठकीमध्ये एसआयआर, राम मंदिराच्या लुटीबाबत आणि पक्षाच्या आगामी वाटचालीबद्दल सविस्तर चर्चा झाली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रभू श्रीरामांच्या प्रतिष्ठेसाठी सुरू केलेली ही चळवळ आता थांबणार नसून प्रत्येक जिल्ह्यात, गावागावात रामरक्षा आंदोलन होणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली. मुंबईनंतर आता राज्याची उपराजधानी नागपूर येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत रामरक्षा आंदोलन होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

शिवसेना आमदारांच्या बैठकीबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, मंगळवारी शिवसेनेच्या 20 आमदारांपैकी 19 आमदार ‘मातोश्री’वर उपस्थित होते. परभणीचे आमदार राहुल पाटील हे जिल्हा बँकेची निवडणूक असल्याने मुंबईत येऊ शकले नाहीत. याची त्यांची रितसर परवानगीही घेतली होती. या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी कोणतेही भाषण किंवा मार्गदर्शन केले नाही. आमदारांच्या भावना, त्यांच्या जिल्ह्यातील राजकीय घडामोडी, पक्षाची वाटचाल कशी पाहिजे हे उद्धव ठाकरे यांनी शांतपणे जाणून घेतले.

काल मुख्यत्वे एसआयआरवर चर्चा झाली. एसआयआरची प्रगती कुठपर्यंत आली या संदर्भात शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी माहिती दिली. या कामात आदित्य ठाकरे यांनी संपूर्ण लक्ष घातलेले आहेत, असेही संजय राऊत यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, दुसरा महत्वाचा विषय काल चर्चेत आला तो म्हणजे राम मंदिर लुटीचा. राम मंदिर लुटीबाबत पक्षाने घेतलेल्या भूमिकेचे सर्व आमदारांनी स्वागत आणि कौतुक केले. त्यांनी उद्धव ठाकरे यांना आवाहन केले की, प्रत्येक जिल्ह्यात आपण अशा प्रकारच्या आंदोलनाला उपस्थित रहा. उद्धव ठाकरे यांनीही सर्व 36 जिल्ह्यांचे आमंत्रण स्वीकारले आहे.

शिवसेनेच्या रामरक्षा आंदोलनाची सुरुवात मुंबईत झाली आणि दुसरा टप्पा उपराजधानी नागपूर येथे होत आहे. पुढच्या आठवड्यात उद्धव ठाकरे नागपूरला येतील. मी आणि अंबादास दानवे पूर्वतयारीसाठी नागपूरला जाणार आहोत. तिथेही मुंबईप्रमाणे भव्य कार्यक्रम होईल. त्यानंतर मग पुणे, नाशिक, कोल्हापूर, संभाजीनगर असे करत संपूर्ण महाराष्ट्र आम्ही पालथा घालू आणि कशाप्रकारे राम मंदिर लुटले, श्रद्धेची विक्री झाली हे गावागावात आणि घराघरात पोहोचवण्याचा प्रयत्न करू, असेही संजय राऊत यांनी सांगितले.

Comments are closed.