मग त्यालाच आमदार घोषित करून टाका; जितेंद्र आव्हाड विधानसभेत कडाडले, म्हणाले, पोलीस मला धमकावतो

मुंबई : विधिमंडळाच्या अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस असून अंतिम आठवड्यात विरोधकांना बोलू दिलं जात नाही, उत्तर देण्यासाठी मंत्री हजर नाहीत, असे म्हणत विरोधी पक्षातील आमदारांनी नाराजी व्यक्त केली. आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनीही आक्रमकपणे भूमिका मांडत काही मुद्द्यांकडे लक्ष वेधले. राज्यातील गुन्हेगारी आणि गृहखात्यावरुन काही प्रश्न देखील उपस्थित केले. यावेळी, मुंब्य्रातील एक पोलीस (Police) अधिकारी मलाच धमकावण्याचा प्रयत्न करत आहे, माझ्याविरुद्ध पोस्कोचा गुन्हा दाखल केल्याचेही आव्हाड यांनी म्हटलं. तसेच, ज्याच्यावर हक्कभंग प्रस्ताव आहे त्याच्यावर तुम्हाला जबाबदारी द्यायची असेल तर मग त्यालाच आमदार म्हणून घोषित करून टाका, असेही आव्हाड यांनी म्हटले.

मुंब्य्रात एक पोलिस अधिकारी आहे, त्याला वाटतं कोण काय करणार आहे? कारण काय तर राजकीय वशिल्याने तो आला आहे. त्याच्यावर हक्कभंगाचा प्रस्ताव पेंडिंग आहे, त्या अधिकाऱ्याला क्राइम युनिट 1 चा प्रमुख केला. ज्याच्यावर हक्कभंग प्रस्ताव आहे, त्याच्यावरच तुम्हाला जबाबदारी द्यायची असेल तर मग त्यालाच आमदार म्हणून घोषित करून टाका, अशा शब्दात आमदार आव्हाड यांनी आपली भूमिका आक्रमकपणे मांडत सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल केला.

एक इन्स्पेक्टर राजकारण करत मला धमकण्याचा प्रयत्न करतो, माझा राजकीय प्रतिस्पर्धी करण्याचा प्रयत्न करतो त्याला तुम्ही कमिशनर क्राइमचा इन्चार्ज करता.  त्या इन्स्पेक्टरने माझ्यावर पोस्कोची केस टाकली, खोटा विनयभंगाचा गुन्हा दाखल केला, त्याच्यावर तुम्ही जबाबदारी सोपवता? तुम्ही लोकशाहीचे एथिक्स संपवत आहात, असा गंभीर आरोपही आव्हाड यांनी केला. मी तुमचा निषेध करतो आहे. मी तुमच्या विचारांच्या विरोधात आहे म्हणून त्याच्या जखमेवर मिठ टाकता. त्याच्या जखमेवर पेट्रोल टाकता, अशी कामगिरी सरकारकडून होतं असेल तर कभी न कभी सूरज नीचे जाता ही है, कभी ना कभी उजेला आता ही है… असेही आव्हाड यांनी म्हटले.

कायदा व सुव्यवस्था नाही का?

आव्हाड यांनी सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात झालेल्या मारहाण प्रकरणाचाही उल्लेख केला. येथील एका दलित मागासवर्गीय कुटुंबाला मार मार मारलं आहे, आजपर्यंत एकालाही अटक झालेली नाही. मुंब्य्रात भाषण करताना सांगितलं की, एक माणूस दिल्लीत 6 खून करून इथ राहात आहे.  मुंब्य्रातील पोलिसांना कळल नाही की एवढा मोठा गुन्हेगार इथ राहत आहे? त्याच मुंब्य्रात नदीम नावाच्या एका व्यक्तीवर भांडण झालं, त्याने त्याच्या घरावर 8 गोळ्या मारल्या आणि त्यानंतर त्याने हवेत 8 गोळ्या झाडल्या. कायदा आणि सुव्यवस्था नाही का, असा सवालही आव्हाड यांनी सरकारला विचारला.

महाराष्ट्रातून लहान मुले कुठं गायब झाली?

रोहित पवारांनी आकडेवारी सांगितली की, लहान मुले बेपत्ता आहेत, आता ही मुलं गेली कुठे? तुम्हाला एपस्टीन फाईल्सबाबत माहिती असेल, त्यात मी खोलवर वाचलं आहे. त्यामध्ये, त्या व्यक्तीच्या आय लँडवर जे जायचे त्यांना लहान मुलांच्या मांडीपासून बनवलेले पॅटीस खायला दिले जायचे. मी अशीही थेरी ऐकली आहे की, लहान मुलाना प्रचंड घाबरून ठेवायचं. ते घाबरल्यानंतर त्यांच्या घाबरण्यामुळे जे केमिकल तयार होते, ते 50 वर्षाच्या स्त्री पुरुषाने घेतलं तर त्यांच वय कमी होतं. हे सगळं रेकॉर्डवर आहे, अशी धक्कादायक माहिती आव्हाड यांनी दिली. तसेच, महाराष्ट्रातून लहानमूलें कूठे जातात याचा तपास व्हायलाच हवा, अशी मागणी देखील आमदार आव्हाड यांनी केली.

अंतिम आठवडा प्रस्ताव

अंतिम आठवडा प्रस्तावाचे जे महत्त्व आहे ते इथ मंत्री उपस्थित असल्यावरून दिसायचं. आमच्यावेळी विरोधी पक्षाचा प्रस्ताव रात्री उशिरा आला तरी सगळे मंत्री उपस्थित राहण्याची तयारी ठेवायचे. त्यावेळी सभागृहात नियमांना महत्व देणारे दिलीप वळसे पाटील खुर्चीवर बसलेले असायचे. विरोधक त्यांना जाऊन भेटले की तुमची सेटिंग होऊन जायची आणि बरोबर विरोधी पक्षाचा प्रस्ताव दुपारी 2 वाजता यायचा. त्यावेळी, खडसे साहेबांचं भाषण दीड तास देवेंद्र फडणवीस भाषण दीड तास, मुनगंटीवार दीड तास बाकी लोकांची त्यांच्यापुढे बोलायची हिंमत नसायची, असे म्हणत आमच्या सत्ताकाळात विरोधकांना टाईम प्लेस दिला जायचा असेही आव्हाड यांनी सभागृहात म्हटले.

Comments are closed.