तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धसका; FDA अधिकारी बनून 6 लाख लुटले,स्वीट मार्ट दुकानदाराला फसवलं
पालघर : आपण तुकाराम मुंढेंच्या (Tukaram mundhe) एफडीएचे अधिकारी असल्याची बतावणी करत वसईतील (Vasai) एका स्वीट्स दुकानाच्या मालकाला धमकी देऊन तब्बल सहा लाख रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी विजय जाधव, स्वाती तुळसकर, तेजस राठोड आणि त्यांच्या एका साथीदाराविरोधात माणिकपूर पोलीस ठाण्यात फसवणूक, खंडणी आणि बनावट सरकारी अधिकारी बनून धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वतःला अन्न व औषध प्रशासन (एफडीए) अधिकारी असल्याचे भासवत आरोपींकडून परिसरातील स्वीट मार्ट तसेच अन्न व औषध प्रशासनाच्या अधीन असलेल्या दुकानांवर कारवाईची धमकी देऊन पैसे उकळण्याचा प्रकार या घटनेमुळे ससोर आला आहे.
राज्यात गेल्या महिनाभरात गावागावात अन्न व औषध प्रशासना विभागाकडून धाडी टाकल्या जात आहेत. कर्तव्यदक्ष सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी पदभार स्वीकारल्यानंतर विभागातून कारवाईला वेग आला आहे. त्यामध्ये, दूध भेसळ, पनीरमधील भेसळ, खाद्यतेल भेसळीचा मुद्दा प्रामुख्याने समोर आला असून एफडीएने विविध जिल्ह्यात कारवाई करत खाद्यसाठा जप्त केला आहे. यासंदर्भात तुकाराम मुंढेंनी देखील पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे. मात्र, अन्न व औषध विभागाच्या सुरू असलेल्या कारवायांचा फायदा घेत एका टोळक्याने स्वत: अधिकारी असल्याचे सांगत दुकानदारांची लूट केल्याचाही प्रकार उघडकीस आला आहे.
गेल्या आठवड्यात मुसळधार पावसामुळे केंद्रस्थानी असलेल्या मुंबई उपनगरातील वसईमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी, तक्रारदार रोहित सुखडिया यांच्या म्हणण्यानुसार, 23 जून रोजी आरोपी त्यांच्या दुकानात आले, आपण एफडीएचे अधिकारी असल्याचे सांगत त्यांनी दुकानातील खाद्यपदार्थ व मुदतबाह्य वस्तूंचा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर, दुकान सील करणे, गुन्हा दाखल करणे आणि माध्यमांमध्ये बदनामी करण्याची धमकी देखील देण्यात आली. अखेर, हे प्रकरण मिटवण्यासाठी सुरुवातीला 12 लाख रुपयांची मागणी स्वीट मार्ट दुकानदाराकडे करण्यात आली. वाटाघाटीनंतर सहा लाख रुपये घेण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
आरोपींवर यापूर्वीही गुन्हा
दरम्यान, विजय जाधव आणि स्वाती तुळसकर यांच्याविरोधात यापूर्वीही बोरीवली येथील एका हॉटेल व्यावसायिकाची बनावट एफडीए अधिकारी बनून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली असून माणिकपूर पोलीस पुढील तपास करत आहेत.
हेही वाचा
Comments are closed.