राम मंदिर देणगी चोरी प्रकरण – कोषाध्यक्ष गोविंददेव गिरी यांचीही चौकशी व्हायला हवी, ते कायद्यापेक्षा मोठे नाहीत! – संजय राऊत

देशभरात सध्या अयोध्येतील श्रीराम मंदिरातील कथित देणगी चोरी प्रकरण चर्चेत आहे. रामभक्तांमध्ये याप्रकरणानंतर संताप आहे. शिवसेनेने याविरोधात रामरक्षा आंदोलन सुरू केले असून नागपूरमध्ये १८ जुलै रोजी आंदोलन होणार आहे.  शिवसेना नेते, खासदार संजय राऊत नागपुरात आहेत. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना संजय राऊत यांनी श्रीराम मंदिर ट्रस्टचे काषाध्यक्ष असलेल्या गोविंददेव गिरी महाराज यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. ‘गोविंददेव गिरी महाराज हे काही कायद्यापेक्षा मोठे नाहीत. राम मंदिर ट्रस्टचे गोविंददेव गिरी महाराज हे कोषाध्यक्ष आहेत आणि ते असताना राम मंदिराचा कोश, तिजोरी लुबाडण्यात आली आहे. ती त्यांची जबाबदारी नाही का?’, असा संतप्त सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे.  राम मंदिराच्या निधीमध्ये कोट्यवधी रुपयांची लूट झाली त्यामुळे त्यांचीही चौकशी व्हायला हवी असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले.

संजय राऊत यांनी कोषाध्यक्षांच्या भूमिकेवरून प्रश्न विचारले की, ट्रस्टचा निधी लुटला जात असताना गोविंददेव गिरी महाराज डोळे बंद करून कुठे झोपले होते का? तिजोरीवर पहारा ठेवणे, चौकीदारी करणे आणि संपूर्ण हिशोब राखणे ही त्यांची जबाबदारी नव्हती का? गोविंददेव गिरी महाराज हे पुण्यातून ऑडिटर पाठवण्याचे समर्थन करत असल्याचा उल्लेख करत संजय राऊत म्हणाले की, राम मंदिर ही केवळ एक वास्तू नसून ती देशाची, विश्वाची आणि तमाम हिंदूंची अस्मिता आहे. आमच्या लोकांनी या मंदिरासाठी बलिदान दिले आहे आणि ट्रस्टचे जबाबदार व्यक्ती पुण्यातून ऑडिटर पाठवण्याच्या गोष्टी करत आहेत, हे अत्यंत दुर्दैवी असल्याचे संजय राऊत म्हणाले. पुढे हे जे उत्तरप्रदेशचे विधानसभा अध्यक्ष बोलतायत हे गोविंददेव गिरी महाराजांबाबत बोलत असावे असाही टोला लगावला आहे.

दुसरीकडे, गोविंददेव गिरी महाराज यांनी या आरोपांवर आपली भूमिका मांडताना स्पष्ट केले आहे की, मी पुण्यात राहत होतो देशभरात प्रवास करत असतो असे म्हणत कोणत्याही धनादेशावर सही नसल्यामुळे आपल्या पदाचा राजीनामा देणार नाहीत असे म्हटले होते. त्यांच्या या भूमिकेवर संजय राऊत यांनी टोला लगावला की, आम्ही त्यांचा राजीनामा मागितलेला नाही, ते स्वतःच वारंवार राजीनाम्याची भाषा करत आहेत. एवढ्या मोठ्या राम मंदिर ट्रस्टच्या खुर्चीला ते मंत्रिपदासारखे का चिकटून बसले आहेत, हे समजत नाही. आपण एवढ्या मोठ्या ट्रस्टचे खजिनदार आहोत आणि आपल्याच देखरेखीखाली खजिना लुटला गेला आहे, याची जाणीव त्यांना असायला हवी. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात कोषाध्यक्ष म्हणून त्यांचीच सर्वाधिक जबाबदारी निश्चित करून एसआयटीमार्फत त्यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.

राम मंदिराच्या चाव्या चोरांच्या हाती, कारभार जमत नसेल तर तो आमच्याकडे सोपवा

भाजप आमदार आणि उत्तर प्रदेशचे विधानसभा अध्यक्ष सतीश महाना यांनी ‘ज्यांची श्रद्धा खोटी होती, त्यांचेच पैसे चोरीला गेले’ असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा खरपूस समाचार घेताना संजय राऊत यांनी, सध्या राम मंदिराच्या चाव्या चोरांच्या हाती असून ही केवळ चोरांचीच भाषा असू शकते, असा संतप्त पलटवार केला आहे. चोराच्या मनात चांदणे असते, म्हणूनच अशी विधाने केली जात असल्याचा सणसणीत टोलाही त्यांनी लगावला. संजय राऊत यांनी भाजप नेत्यांच्या वक्तव्याचा निषेध करत हा थेट रामभक्तांचा आणि कारसेवकांचा अपमान असल्याचे म्हटले आहे. राम मंदिराचा संपूर्ण कारभार सध्या भाजपच्या थेट नियंत्रणाखाली चालत आहे. अशा परिस्थितीत, श्रद्धा खोटी असल्याच्या बाता मारणे म्हणजे राम मंदिरासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शेकडो कारसेवकांच्या बलिदानाचा आणि त्यांनी सांडलेल्या रक्ताचा घोर अपमान आहे. ज्यांनी या आंदोलनात स्वतःला झोकून दिले, रक्त सांडले, ती माणसे आणि त्यांची श्रद्धा खोटी होती का? असा जळजळीत सवाल राऊत यांनी उपस्थित केला. जर तुम्हाला राम मंदिराचा कारभार प्रामाणिकपणे आणि कार्यक्षमतेने चालवणे जमत नसेल, तर या मंदिराच्या चाव्या आमच्यासारख्या हिंदुत्ववादी संघटनेच्या हाती सोपवाव्यात, अशी मागणी त्यांनी केली. आम्ही राम मंदिराचा कारभार अत्यंत पारदर्शक आणि उत्तम पद्धतीने करून दाखवू, असा विश्वास व्यक्त केला.

Comments are closed.