तुरुंगात असलेल्या मोटेगावरकरांच्या RCC क्लासचा NEET निकालानंतर जल्लोष, थोड्याच वेळात CBI दाखल

NEET पेपर लीक प्रकरणाची CBI चौकशी : नीट पेपरफुटीनंतर चर्चेत आलेल्या लातूरमधील शिवराज मोटेगावकरांच्या आरसीसी या कोचिंग सेंटरच्या विद्यार्थ्यांनी पुन्हा घेण्यात आलेल्या नीट परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवलं. त्यानंतर या क्लासमध्ये जल्लोष सुरू झाला. मात्र या जल्लोषानंतर काहीच वेळात या सेंटरवर चौकशीसाठी सीबीआयचं पथक धडकल्याची घटना घडली.

नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणाच्या तपासाची साखळी जोडण्यासाठी केंद्रीय अन्वेषण विभागाचे (CBI) पथक पुन्हा एकदा लातूरमध्ये धडकले आहे. नीट परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर काही वेळातच सीबीआयचे 8 अधिकाऱ्यांचे पथक पुण्यातून लातूरमध्ये दाखल झाले. या कारवाईमुळे लातूरमधील शैक्षणिक वर्तुळात आणि कोचिंग क्लास चालकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सीबीआयचे अधिकारी लातूरमधील नामांकित ‘आरसीसी’ (RCC) कोचिंग क्लासेसमध्ये दाखल झालं. या ठिकाणी तीन तासाहून अधिक काळ सीबीआयच्या पथकाकडून विविध कागदपत्रांची कसून पडताळणी करण्यात आल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, नीट परीक्षेच्या निकालानंतर आरसीसी कोचिंग क्लासेसमध्ये उत्तम निकालाचा जल्लोष करण्यात आला होता. हा जल्लोष संपताच काही वेळात सीबीआयचे पथक तिथे पोहोचल्याने या कारवाईने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

नीट पेपरफुटीनंतर झालेल्या री नीट परीक्षेत आरसीसीमधील 2,200 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यापैकी 36 विद्यार्थ्यांनी 600 पेक्षा अधिक गुण मिळवले असून, 530 पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सुमारे साडेपाचशेच्या घरात आहे. त्यानंतर कोचिंग क्लासच्या वतीने जल्लोष करण्यात आला.

Shivraj Motegaonkar CBI Enquiry : शिवराज मोठेगावकर यांच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी

या धडक कारवाईत केवळ कागदपत्रांचीच तपासणी केली जात नाही, तर काही खासगी कोचिंग क्लास चालक आणि प्रसिद्ध प्राध्यापक शिवराज मोठेगावकर यांच्या आर्थिक व्यवहारांचीही चौकशी केली जाणार आहे. नीट पेपरफुटी प्रकरणाशी संबंधित संशयास्पद आर्थिक व्यवहारांची माहिती, बँक खात्यांचे तपशील आणि इतर कागदपत्रे सीबीआयच्या रडारवर असून, या अनुषंगाने सर्व पुरावे गोळा केले जात आहेत.

CBI Latur Visit 3rd Time : या महिन्यात तिसऱ्यांदा सीबीआय लातूरमध्ये

नीट पेपरफुटी प्रकरणाचा तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतशी नवनवीन माहिती समोर येत आहे. याच माहितीची खातरजमा करण्यासाठी आणि ठोस पुरावे संकलित करण्यासाठी सीबीआयचे पथक या एकाच महिन्यात तब्बल तिसऱ्यांदा लातूरमध्ये आले आहे. यावरून केंद्रीय यंत्रणा या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी वेगाने हालचाली करत असल्याचे स्पष्ट होत आहे.

Suspense On CBI Action : तपासाबाबत सीबीआय कमालीची गोपनियता

आरसीसी कोचिंग क्लासेसमध्ये सीबीआयचे अधिकारी ठाण मांडून बसले असले आणि चौकशीचा धडाका सुरू असला, तरी तपासाच्या नेमक्या स्वरूपाबाबत सीबीआयच्या वतीने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती प्रसारमाध्यमांना देण्यात आलेली नाही. मात्र, सीबीआयच्या या वारंवार होणाऱ्या वाऱ्यांमुळे लातूरमधील मोठ्या कोचिंग लॉबीचे धाबे दणाणले आहेत.

ही बातमी वाचा:

Comments are closed.