उजनी धरणातून सोलापूरला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटली, लाखो लीटर पाणी वाया
सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणातून सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी माढा तालुक्यातील मौजे वेणेगाव येथे महामार्गाजवळ फुटल्याची घटना शनिवारी सकाळी ११.३० च्या सुमारास घडली. जलवाहिनीचा व्हॉल्व खराब झाल्यामुळे ही पाईपलाईन फुटली असून, पाण्याच्या प्रचंड दाबामुळे हवेत उंचावर पाण्याचे कारंजे उडू लागले होते. यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले असून परिसराला तळ्याचे स्वरूप आले होते.
सोलापूर महानगरपालिकेने सोलापूर शहरास पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी ही जलवाहिनी टाकली आहे. मात्र, ही वाहिनी आता अत्यंत जीर्ण झाली असून वेगवेगळ्या ठिकाणी ती सतत फुटण्याच्या घटना घडत आहेत. शनिवारी वेणेगाव येथील व्हॉल्व अचानक निकामी झाल्याने पाण्याचे प्रचंड उंच फवारे उडू लागले. या पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे परिसरातील अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरले, ज्यामुळे संसार उपयोगी वस्तूंचे मोठे नुकसान झाले. तसेच नागरिकांनी बांधकामासाठी आणलेली खडी आणि वाळूही या पाण्यात वाहून गेली. यासोबतच शेतात पाणी घुसल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. या झालेल्या नुकसानीचे प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी आता नुकसानग्रस्त नागरिकांमधून केली जात आहे.
दरम्यान, पुणे-सोलापूर महामार्गाच्या अगदी जवळच ही जलवाहिनी असल्याने रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनधारकांनी आपली वाहने बाजूला उभी करून हे पाण्याचे फवारे पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती. तर स्थानिक लहान मुलांनी या पाण्याच्या कारंज्याखाली भिजण्याचा आनंद लुटला. या घटनेची माहिती मिळताच मोडनिंब महामार्ग सुरक्षा पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश पवार हे पथकासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी महामार्गावरील बघ्यांची गर्दी बाजूला सारत वाहतुकीला होणारा अडथळा दूर केला आणि वाहतूक पूर्ववत सुरळीत केली.
जलवाहिनी फुटून पाणी गळती होत असल्याची माहिती मनपा प्रशासनाला मिळताच तासाभरात उजनी येथील मुख्य पंप हाऊस बंद करण्यात आले. परंतु, तोपर्यंत पाण्याचा प्रवाह इतका मोठा होता की, परिसरातील शेतांना आणि घरांना तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते.
Comments are closed.