मुंबईत गुरुवारपासून ६ ऑगस्टपर्यंत जमावबंदी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

तरुणाईने घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे सरकारला धडकी भरली असून मुंबईत येत्या गुरूवारपासून ६ ऑगस्टपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. या कालावधीत सभा, संमेलने, मिरवणुकांना मनाई करण्यात आली असून लाऊडस्पीकर, बॅन्ड, फटाकेबाजीवरही निर्बंध घातले गेले आहेत.

मुंबईतील शांतता भंग होण्याची तसेच मानवी व मालमत्तेच्या नुकसानीची दाट शक्यता येत्या दिवसात असल्याची माहिती गृह विभागाला मिळाली आहे. त्यामुळे सरकारच्या आदेशावरून मुंबई पोलिसांनी संपूर्ण मुंबई शहरात प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. २३ जुलै रोजी रात्री १२.०१ वाजल्यापासून ते ६ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १२.०० वाजेपर्यंत संपूर्ण मुंबईत ५ किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे.

या कालावधीत शहरात कोणत्याही प्रकारच्या बेकायदेशीर सभा, संमेलन किंवा मिरवणुका काढण्यास संपूर्ण मनाई करण्यात आली आहे. तसेच अशा कार्यक्रमांमध्ये लाऊडस्पीकर, वाद्ये, बँड पथके आणि फटाक्यांच्या वापरावरही निर्बंध घालण्यात आले आहेत.

लग्नसोहळे, अंत्ययात्रांना वगळले
लग्नसोहळे, कौटुंबिक समारंभ, अंत्ययात्रा आणि अंत्यसंस्काराच्या सभांना या जमावबंदीतून सूट देण्यात आली आहे. त्याच प्रमाणे कंपन्या, सहकारी संस्था आणि विविध संघटनांच्या दैनंदिन कायदेशीर बैठका किंवा सामाजिक मेळावे नेहमीप्रमाणे घेता येणार आहेत. करमणुकीच्या ठिकाणी कार्यक्रम पाहण्यासाठी नागरिकांना एकत्र येण्याची मुभा देण्यात आली आहे.

Comments are closed.