Ratnagiri News – कोकण कृषि विद्यापीठाच्या संशोधन केंद्राला देशपातळीवरील ‘सर्वोत्कृष्ट संशोधन केंद्र’ पुरस्कार
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली येथील अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प ‘कृषि आणि संबधित क्षेत्रातील श्रमविज्ञान आणिण सुरक्षितता’ या संशोधन केंद्राला २०२५-२६ या वर्षासाठी देशपातळीवरील ‘सर्वोत्कृष्ट संशोधन केंद्र पुरस्कार’ जाहीर झाला आहे.
भारतीय कृषि अनुसंधान परिषद ICAR अंतर्गत कार्यरत असलेल्या या संशोधन केंद्राने संशोधन, तंत्रज्ञान विकास, शेतकरी हिताची उपकरणे निर्मिती, प्रशिक्षण आणि विस्तार कार्यामध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराचे वितरण आगामी वार्षिक कार्यशाळेत मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. या पुरस्कारामुळे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
या संशोधन केंद्राचे प्रकल्प अन्वेषक प्रा. डॉ. विजय आवारे यांनी वार्षिक कार्यशाळेदरम्यान केंद्राच्या संशोधन कार्याचे, विकसित तंत्रज्ञानाचे तसेच शेतकरी हितासाठी राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचे सादरीकरण केले. त्यांच्या सादरीकरणाला भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या अधिकाऱ्यांकडून विशेष दाद मिळाली. प्रकल्पाचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. सुखबीर सिंग यांनी ई-मेलव्दारे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय भावे यांचे अभिनंदन करत केंद्राच्या सातत्यपूर्ण प्रगतीचे आणि उत्कृष्ट कार्याचे कौतुक केले.
कुलगुरु डॉ. संजय भावे यांनी संशोधन केंद्रातील सर्व वैज्ञानिक, तांत्रिक अधिकारी, कर्मचारी आणि संशोधनाशी संबधित सहकाऱ्यांचे अभिनंदन करत हा पुरस्कार संपूर्ण विद्यापीठासाठी अभिमनाची बाब असल्याचे सांगितले. भविष्यातही शेतकरी-केंद्रीत संशोधन, आधुनिक तंत्रज्ञान विकास आणि कृषि यांत्रिकीकरणाला चालना देण्यासाठी विद्यापीठ कटिबध्द राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
२००९ पासून कार्यरत असलेले हे संशोधन केंद्र कृषि व संबधित क्षेत्रातील श्रमविज्ञान, सुरक्षितता आणि महिलांसह शेतमजुरांचे श्रम कमी करणारी आधुनिक साधने विकसीत करण्यासाठी कार्यरत आहे. शेतीतील कामगारांची कार्यक्षमता वाढविणे, शारिरीक ताण कमी करणे, अपघातांचे प्रमाण कमी करणे आणि सुरक्षित कृषि तंत्रज्ञानाचा प्रसार करणे हे केंद्राचे प्रमुख उद्दिष्ट आहे. संशोधन केंद्राने विकसीत केलेल्या मनुष्यचलीत तसेच बॅटरीचलीत ‘कोकण प्रसन्ना’, भात लावणी यंत्र, नाचणी मळणी-सडणी यंत्र यांसारख्या अनेक नाविन्यपूर्ण उपकरणांचा शेतकरी मोठ्या प्रमाणावर वापर करत आहेत. केंद्राने विकसीत केलेलया तंत्रज्ञानापैकी अनेकांना भारतीय पेटंट कार्यालयाकडून डिझाईन रजिस्ट्रेशन प्राप्त झाले आहे. विकसीत केलेली यंत्रे विक्री तसेच भाडेतत्वावर उपलब्ध करुन देण्यात आली असून, विविध प्रशिक्षण शिबिरे, प्रात्यक्षिके आणि कृषि प्रदर्शनांच्या माध्यमातून त्यांचा प्रसार करण्यात येत आहे.
केंदाने संशोधनासोबतच शेतकरी, महिला बचत गट, युवक आणि कृषि उद्योजक, यांच्यासाठी सातत्याने प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करुन आधुनिक कृषि तंत्रज्ञान गावागावात पोहोचविण्याचे महत्वपूर्ण कार्य केले आहे. त्यामुळे कोकणासह राज्यातील अनेक भागांमध्ये या तंत्रज्ञानाचा लाभ शेतकऱ्यांना होत आहे.
या उल्लेखनीय यशामागे कुलगुरु डॉ. संजय भावे, संशोधन संचालक, संचालक, विस्तार शिक्षण, संचालक शिक्षण, सहयोगी अधिष्ठाता, संबधित विभागप्रमुख तसेच विद्यापीठ प्रशासनाचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन प्रोत्साहन आणि सहकार्य लाभल्याचे प्रकल्प अन्वेषक प्रा. डॉ. विजय आवारे यांनी नमूद केले. संशोधन केंद्रातील सर्व वैज्ञानिक तांत्रिक अधिकारी, कर्मचारी आणि सहकारी यांच्या सांघिक प्रयत्नामुळे हा राष्ट्रीय सन्मान प्राप्त झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
Comments are closed.