Buldhana News – विद्यार्थ्यांसह जिल्हा परिषदेत भरली शाळा; अनोख्या आंदोलनाला यश, सहा शिक्षकांची तातडीने नियुक्ती

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

जळगाव-जामोद तालुक्यातील आदिवासी भिंगारा आणि चाळीस टापरी येथील जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे विद्यार्थ्यांचे होत आहे. विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान लक्षात घेत पालकांनी सोमवारी तब्बल ७५ हून अधिक विद्यार्थ्यांना थेट जिल्हा परिषद कार्यालयात आणून प्रतीकात्मक शाळा भरविली. या अनोख्या आंदोलनाची मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी तातडीने दखल घेत भिंगारा येथे पाच आणि चाळीस टापरी येथे एक अशा एकूण सहा शिक्षकांच्या नियुक्तीचे आदेश दिल्याने आंदोलनाला यश आले.

भिंगारा येथील जिल्हा परिषद निवासी शाळेत इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत शिक्षणाची व्यवस्था आहे. मात्र सहावी ते दहावीपर्यंत सात शिक्षकांची आवश्यकता असताना गेल्या तीन वर्षांपासून बहुतांश पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. वारंवार पाठपुरावा करूनही शिक्षक मिळत नसल्याचा आरोप जय आदिवासी संघटनेचे राधेश्याम खरात यांनी केला. अखेर राधेश्याम खरात, देवीदास डावर, नंदू सोळंकी यांच्यासह पालकांनी विद्यार्थ्यांना बुलढाण्यात आणून जिल्हा परिषद प्रांगणातच शाळा भरविली. ‘जोपर्यंत शिक्षक मिळत नाहीत, तोपर्यंत येथून हलणार नाही,’ असा ठाम पवित्रा आंदोलकांनी घेतला.

या आंदोलनाची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी स्वतः विद्यार्थी व पालकांची भेट घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर शिक्षण विभागाला तात्काळ आदेश देत भिंगारा शाळेसाठी पाच शिक्षकांची नियुक्ती केली. काही तासांतच नियुक्तीपत्रे पालकांच्या हाती देण्यात आली. याशिवाय, चाळीस टापरी येथील जिल्हा परिषद शाळेत ५८ विद्यार्थ्यांसाठी केवळ एकच शिक्षक कार्यरत असल्याने तेथेही आणखी एका शिक्षकाची तातडीने नियुक्ती करण्यात आली. प्रशासनाच्या या त्वरित निर्णयामुळे विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असून, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला शिक्षकांचा प्रश्न अखेर मार्गी लागल्याने आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Comments are closed.