ठाकरे बंधूंकडून मोर्चात एकत्र येण्याची तयारी; दुसरीकडे अभिनेत्री आयशा खानला पोलिसांच्या ताब्यात

मुंबई : नीट पेपरफुटी प्रकणावरुन दिल्लीच्या जंतर मंतरवर विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरु आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan)  यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे. या आंदोलनाला अनेक राजकीय पक्षांनी विविध संघटनांनी पाठिंबा दिली आहे. महाराष्ट्रात देखील ठिकठिकाणी आंदोलने सुरु आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा ही मागणी जोर धरत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे रविवारी एकत्रित मोर्चा काढण्याच्या तयारीत असल्याची माहितची मिळत आहे.

रविवारी राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्रित मोर्चामध्ये सहभागी होऊन विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणार

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ठाकरे बंधूंसह विरोधी पक्ष एकत्रित मोर्चा काढण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे. रविवारी शिवाजी पार्क इथे ठाकरे बंधूंचा संयुक्त मोर्चा विद्यार्थ्यांच्या पाठिंबासाठी काढला जाणार आहे. मागील रविवारीच ठाकरे बंधू एकत्र येऊन हा मोर्चा काढणार होते, मात्र काही कारणास्तव संयुक्त मोर्चा काढता आला नाही. मात्र येणाऱ्या रविवारी राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्रित मोर्चामध्ये सहभागी होऊन विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला आणि मागण्यांना पाठिंबा देत मोर्चा काढणार असल्याची माहिती मिळाली आहे.

काही न करता ताब्यात घेतलं, दंगल फेम अभिनेत्री आयेशा खानचे मुंबई पोलिसांवर आरोप

दंगल फेम अभिनेत्री आयेशा खानचे मुंबई पोलिसांवर आरोप  केले आहेत. काही न करता देखील ताब्यात घेतल्याचा आरोप आयेशा खानने केले आहेत. पोलिसांनी धक्का मारल्याचा तसेच जबरदस्ती वॅनमध्ये बसवून पोलीस ठाण्यात आणल्याचा दावा केला आहे. नीट परीक्षेत आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ दुपारी चार वाजता आलो असता काही न करताच पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा दावा आयेशा खानने केला आहे. आम्ही केवळ तीन लोक असताना देखील जमावबंदीच उल्लंघन केल्यानंतर्गत आम्हाला ताब्यात घेण्यात आल्याचा दावा केला आहे. वरळी पोलीस ठाण्यात बसूनच ही पोस्ट केली आहे. संध्याकाळी सहा वाजता सगळ्यांना सोडून देण्यात आल्याची माहिती देखील मिळाली आहे.

सळसळतं रक्त थंड होऊ देऊ नका, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा व्हायलाच पाहिजे : आदित्य ठाकरे

ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी देखील आक्रमक पवित्रा घेतला आहे. तुमचं सळसळतं रक्त थंड होऊ देऊ नका, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा व्हायलाच पाहिजे असे आदित्य ठाकरे म्हणाले.  येत्या 24 तारखेला चार वाजता शिवाजी पार्क येथे एकत्र राष्ट्रगीत गायन करणार असल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. मुंबई पोलिसांमध्ये अजून संवेदनशीलपणा आहे. दिल्लीप्रमाणे मुंबई पोलिसांनी लाठी चार्ज केला नाही असेही आदित्य ठाकरे म्हणाले. 24 तारखेला कुठल्याही पक्षाच्या झेंड्याखाली नाही तर भारताच्या झेंड्याखाली पुन्हा एकत्र येऊया आणि राष्ट्रगान गाऊया असे आवाहन असे आदित्य ठाकरे यांनी तरुणांना केलं आहे.

Comments are closed.