Khalapur news – इर्शाळगडावर अडकलेल्या दोन तरुणांची सुटका

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

इर्शाळगडावर पर्यटनासाठी आलेल्या ठाणे शहरातील दोन तरुणांची इर्शाळवाडीतील शेतकऱ्याने सुटका केली आहे. गडावर आल्यानंतर पडलेले दाट धुके आणि सुरू झालेला धो धो पाऊस यामुळे हे दोन्ही तरुण भरकटले. त्यानंतर त्यांनी मदतीसाठी पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी ही माहिती इर्शाळवाडीतील ग्रामस्थांना दिली. त्यानुसार कमळू पारधी (७०) यांनी गडावर जाऊन या तरुणांची सुखरूप सुटका केली. तीन वर्षांपूर्वी घडलेल्या इर्शाळवाडी दुर्घटनेत कमळू यांच्या कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

ठाण्यातील चेंदणी कोळीवाडा परिसरात राहणारे निखिल शिंदे आणि तन्मय शिंदे हे आज इर्शाळवाडी परिसरात पर्यटनासाठी आले होते. इर्शाळगडावर गेल्यानंतर धो धो पाऊस सुरू झाला. सोसाट्याचा वाराही सुटला. त्यातच पडलेल्या दाट धुक्यामुळे समोरचे काहीच दिसत नव्हते. त्यामुळे हे दोन्ही तरुण रस्ता चुकले. चौकचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंगटे यांनी स्थानिक पोलीस, कमलू पारधी, निखिल मालुसरे, कौस्तुभ कुंभार, आविष्कार पाटील यांच्या मदतीने या दोन तरुणांना सुरक्षितपणे गडावरून खाली आणले.

१९ जुलै २०२६ रोजी इर्शाळवाडीच्या दुर्घटनेला तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. या दुर्घटनेत कमळू पारधी यांची पत्नी, मुलगा, सून आणि दोन नातवंडे अशा पाच जणांचा मृत्यू झाला.

कमळू पारधी हे शेतकरी आहेत. त्यांच्यावर इतका मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला असतानाही गडावर अडकलेल्या पर्यटकांना निःस्वार्थ मदत करीत आहेत.

Comments are closed.