CWG 2026: नाशिकच्या सर्वेश कुशारेची ऐतिहासिक झेप! भारताला उंच उडीत जिंकून दिले पहिले सिल्व्हर मेडल

ग्लासगोमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये भारताचे ऍथलेटिक्स अपेक्षेनुसार पदकविजेती कामगिरी करत आहे. सर्वेश कुशारे (Sarvesh Kushare) याने ऐतिहासिक रौप्यपदक जिंकले आहे. त्याने पुरुषांच्या उंच उडीमध्ये हे पदक जिंकले, जे भारताचे या स्पर्धेच्या इतिहासातील या प्रकारामधील पहिलेच रौप्य पदक ठरले आहे.

भारतासाठी पुरुषांच्या उंच उडीमध्ये चार वर्षांपूर्वी तेजस्विन शंकरने पदक जिंकण्याची कामगिरी केली होती. बर्मिंघममध्ये झालेल्या त्या स्पर्धेत शंकरने कांस्य पदक जिंकले होते.

राष्ट्रीय विक्रमधारक कुशारेने 2.25 मीटर उडी मारून रौप्य पदकाची कमाई केली आहे. अशाप्रकारे त्याचे हे या स्पर्धेतील पदार्पण जबरदस्त ठरले आहे. या स्पर्धेतील भारताने उंच उडीमधील हे पहिलेच आणि एकूण आठवे पदक ठरले. त्यानंतर भारताच्या पदकामध्ये आणखी दोन संख्येने भर पडली. यामुळे भारताने आतापर्यंत 2 सुवर्ण, 5 रौप्य आणि 3 कांस्य पदकांसह एकूण 10 पदके जिंकली आहेत.

भारतीय सैन्यातील सुभेदार कुशारे
कुशारेचा जन्म 17 जून, 1995 रोजी नाशिक जिल्ह्यातील देवगावमध्ये झाला. त्याला शालेय जीवनापासूनच उंच उडीची आवड निर्माण झाली. क्रीडा कोट्यातून नोकरी मिळवून आपल्या कुटुंबाची परिस्थिती सुधारणे हे त्याचे ध्येय होते.

कुशारे 2016 मध्ये भारतीय सैन्यात दाखल झाला. नायब सुभेदार म्हणून त्याची नियुक्ती करण्यात आली. नंतर त्याने आपला खेळ उंचावण्याचे प्रयत्न केले, ज्याचे फळ त्याला मिळाले.

राष्ट्रीय रेकॉर्ड होल्डर आणि ऐतिहासिक रौप्य
कुशारेच्या क्रीडा कारकिर्दीबद्दल पाहिले, तर त्याने 2019 च्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले. 2023 च्या आशियाई ऍथलेटिक्स चॅम्पियनशीपमध्ये रौप्य आणि मागील महिन्यात 2.31 मीटरची उडी मारून तेजस्विन शंकरचा आठ वर्ष जुना राष्ट्रीय विक्रम मागे टाकला.

कुशारेने नंतर डायमंड लीगमध्ये 2.26 मीटरची उडी मारत तिसरे स्थान गाठले होते. आता त्याने आपल्या पहिल्याच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ऐतिहासिक रौप्य पदकावर नाव कोरले आहे. (Commonwealth Games 2026 Sarvesh Kushare clinch Silver Medal in Men’s High Jump at Glasgow)

Comments are closed.