भाजपच्या निर्णयामुळे शाळेतील मुलं 27 वस्तूंपासून वंचित, आदित्य ठाकरे यांची टीका

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मुंबई महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि गणवेश मिळण्यास झालेला उशीर आणि भाजपच्या निर्णयामुळे झालेल्या गोंधळावरून शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी तीव्र शब्दांत सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला आहे. फेब्रुवारी-मार्च महिन्यांची जुनी प्रथा बदलून भाजपकडून चुकीचे निर्णय घेण्यात आल्यामुळे मोठा घोळ झाला असून, यामुळे विद्यार्थी 27 प्रकारच्या आवश्यक वस्तूंपासून वंचित राहिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. शाळा सुरू होऊन दोन महिने उलटले तरी अनेक विद्यार्थ्यांना अद्याप गणवेश आणि स्टेशनरी मिळालेली नाही, याला प्रशासन किंवा शिक्षक नव्हे तर केवळ भाजपचा निर्णय कारणीभूत असल्याचे सांगत भाजपने या प्रकरणी माफी मागावी, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

शाळेतर्फे देण्यात येणाऱ्या सोयीसुविधांचा आढावा घेण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी आज धारावी ट्रान्झिट कॅम्प येथील शाळेची पाहणी केली. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी शाळांविषयी माहिती दिली. जेम पोर्टल प्रस्ताव आला होता शाळा सुरू होता होताच आम्ही सर्व वस्तू दिल्या जातील अशा वल्गना केल्या होत्या. असं त्यांनी सांगितले होते पण शाळा सुरू होऊन दोन महिने झाले. शाळा कधी सुरू होणार? पुढच्यावर्षीची पुस्तकं आता देणार का? असा संतप्त सवाल त्यांनी केला. पुढे आदित्य ठाकरे म्हणाले की, अनेक ठिकाणी पाहतो गणवेश आता आता ऑगस्टमध्ये जायला लागलेले आहेत. काही वर्गांमध्ये नवीन गणवेश घालण्यात आले तर काहींनी मागच्या वर्षीचे गणवेश घातले आहेत. तर काही वर्गांमध्ये गणवेश गेलेले नाहीत. स्टेशनरी काही वर्गांना मिळालेली आहे. काही वर्गांना नाही आणि हे मुंबईभर आम्ही पाहतोय. अनेक वेगळ्या शाळांमध्ये हीच परिस्थिती पाहयला मिळत आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

मुंबई भाजप अध्यक्ष महापौर असं म्हणतात की जेम पोर्टलवरून खरेदी केल्यामुळे भ्रष्टाचार होणार नाही आणि वेळ लागेल असे सांगितले जात आहे, त्यावर आदित्य ठाकरे म्हणाले की, वेळ लागणार म्हणजे? याचा अर्थ विद्यार्थ्यांना अभ्यास संपल्यानंतर किंवा पास झाल्यानंतर पाचवीची पुस्तके देणार का? हे कुठलं कॅल्क्युलेशन आहे तुमचं? असा सवाल त्यांनी केला. पुढे ते म्हणाले, नशीब आता मिसिंग लिंकसारखं सांगितलं नाही की, पुस्तकं आम्ही हॉलंडमधून आणतोय, हे जर्मनीमधून आणतोय, छत्र्या आम्ही फ्रान्समधून आणतोय नशीब तेवढं तरी खोटं बोलले नाहीत. पण एवढं तर सर्वांना स्वच्छपणे दिसतंय की अजूनही वर्गांमध्ये ज्या गोष्टी जायला पाहिजेत त्या गेलेल्या नाहीत, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

आदित्य ठाकरे म्हणाले की, परवाच आपल्या माध्यमातून कर्जत येथील त्या लहान मुलींचा व्हिडीओ पाहिला. त्यात त्या मुलींनी स्वत: सोशल मीडियावर येऊन ती तक्रार केली होती, मग आपण तो विषय घेतला होता. आता थोडं डागडुजीचे काम सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले. पुढे आदित्य ठाकरे म्हणाले की, आपल्या राज्याच्या राजधानी मुंबईत ही परिस्थिती असेल विद्यार्थ्यांना गणवेश गेलेले नाहीत, स्टेशनरी पोहोचलेली नाही मग इतर ठिकाणी काय अपेक्षा करायची? अजून एक सांगतो सोमवारी माझी ज्या नगरसेवकांसोबत बैठक झाली. त्यांना ओपन स्पेस बाबत सांगितलेलेच आहे. शाळांचे आरक्षण बदलून त्या प्रायव्हेटायझेशनच्या हाती दिलेले आहे. अनेक ठिकाणी गणवेश दिलेले नाहीत. आपण कोणाचाही वॉर्ड असो प्रत्येक शाळेत जाऊन तिथल्या मुख्याध्यापकांना भेटून संवाद साधावा आणि काय तिथे कमी आहे तिथे पूर्तता करावी. आमचं सरकार असताना आम्ही ते सातत्याने करायचो असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

Comments are closed.