नवी मुंबईत भाजपने केली शिंदे गटाची कोंडी, घणसोलीत क्लस्टरची वीटही रचू देणार नाही; महासभेत प्रस्तावावर वादळी चर्चा
घणसोलीतील सिम्प्लेक्स सोसायटीच्या विकासासाठी क्लस्टरला मंजुरी मिळाल्यानंतर भाजप आणि शिंदे गटात सुरू झालेला वाद आज थेट नवी मुंबई महापालिकेच्या महासभेत पोहोचला. माथाडींच्या वसाहतीचा विकास क्लस्टरऐवजी पुनर्विकास योजनेतून व्हावा, अशी भूमिका भाजपच्या नगरसेवकांनी घेऊन शिंदे गटाची कोंडी केली. घणसोलीत क्लस्टरची एक वीटही रचू देणार नाही, अशी भूमिका भाजपच्या नगरसेवकांनी घेतल्यानंतर शिंदे गटाने होणार होणार क्लस्टर होणार अशी घोषणाबाजी केली. दिवसभर या विषयावर वादळी चर्चेने सभागृह तापले होते.
नगरविकास खात्याच्या सूचनेनुसार महापालिका प्रशासनाने घणसोलीत क्लस्टर अंतर्गत पुनर्विकासाची अधिसूचना काढली त्याचे पडसाद महासभेत उमटले. सभागृह नेते सागर नाईक यांनी मांडलेल्या ७४ आणि ७५ क्रमांकाच्या ठरावावर सर्वप्रथम चर्चा करण्याचा निर्णय महापौर सुजाता पाटील यांनी घेतला. या दोन्ही प्रस्तावांवर चर्चा सुरू असताना सभागृहात जोरदार गोंधळ उडाला. भाजप आणि शिंदे गटाचे नगरसेवक आमनेसामने आले. घणसोली येथील सिम्प्लेक्स सोसायटीच्या विकासासाठी लागू करण्यात आलेल्या क्लस्टर योजनेला भाजपच्या नगरसेवकांनी कडाडून विरोध केला. त्यामुळे शिंदे गटही आक्रमक झाला. या दोन प्रस्तावांवर सुमारे दिवसभर चर्चा चालली. तरीही ७५ क्रमांकाच्या प्रस्तावावर कोणताही निर्णय झाला नाही. या प्रस्तावावर उद्या पुन्हा तहकूब महासभेत चर्चा होणार आहे.
– भाजपचे सुधाकर सोनावणे, सूरज पाटील, नेत्रा शिर्के, रामचंद्र घरत यांनी अवाचेसवा दिल्या जात असलेल्या एफएसआयला कडाडून विरोध केला तर शिंदे गटाचे विजय चौगुले, किशोर पाटकर, द्वारकानाथ भोईर यांनी क्लस्टरच्या बाजूने आपली भूमिका व्यक्त केली.
– नवी मुंबई शहरात धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाशिवाय अन्य कोणत्याही योजनेतील बांधकामांना परवानगी देऊ नये, अशी मागणी भाजपच्या नगरसेवकांनी यावेळी लावून धरली.
– डंपिंग ग्राऊंड नाही म्हणून कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील बांधकाम परवानग्या न्यायालयाने थांबवल्या होत्या. तशी अवस्था नवी मुंबईचीही होणार आहे. मूलभूत सुविधांवर ताण पडणार आहे, असेही मत नगरसेवकांनी व्यक्त केले.
…तर शहराची वाटचाल अंधारात
शहरातील धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाला परवानगी देताना दिला जात असलेला वारेमाफ एफएसआय हा शहरासाठी घातक आहे. क्लस्टरची गरज नसतानाही क्लस्टरमधून विकास होत असेल तर शहराची वाटचाल ही अंधाराकडे सुरू होणार आहे. अशा पद्धतीने होत असलेल्या विकासामुळे शहरावर प्रचंड ताण पडणार आहे. या विकासातून रहिवाशांचे नाही तर बांधकाम व्यावसायिकांचे चांगले भले होणार आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी सभागृह नेते सागर नाईक यांनी व्यक्त केली.
Comments are closed.