Chandrapur crime news – कौटुंबिक वादातून वडिलांचे मुलांवर धारदार शस्त्राने वार; 7 वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू, दुसरा गंभीर जखमी
कौटुंबिक वादातून वडिलांनीच दोन मुलांवर धारदार शस्त्राने वार केल्याची धक्कादायक घटना चंद्रपूरमधील दुर्गापूर भागामध्ये घडली. या हल्ल्यामध्ये 7 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला असून 11 वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला आहे. जखमी मुलावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. देवांश मंगेश बदखल असे मृत मुलाचे नाव आहे, तर सुशांत मंगेश बदखल असे जखमी मुलाचे नाव आहे. या प्रकरणी आरोपी वडील मंगेश बदलख (वय – 40) यांना पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुर्गापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या शक्तीनगर कॉलनीमध्ये आरोपी आपल्या दोन मुलांसह राहत होता. सीटीपीएसमध्ये तो कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. गेल्या काही महिन्यांपासून आरोपीची पत्नी त्याच्यापासून विभक्त राहत होती. यामुळे नैराश्यात गेलेल्या आरोपीने सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास दोन्ही मुलांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केले. आरोपीचा भाऊ घरी आल्यानंतर त्याला दोन्ही पुतणे रक्ताच्या थारोळ्यात दिसले. शेजाऱ्यांच्या मदतीने दोन्ही मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासानंती 7 वर्षांच्या देवांशला मृत घोषित केले, तर 11 वर्षांच्या सुशांतवर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, दोन्ही मुलांवर वार केल्यानंतर आरोपी वडिलांनी जीवन संवण्याचा प्रयत्न केला. आधी गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, मात्र छोटा भाऊ घरी आल्याने आरोपीने पळ काढला. त्यानंतर विहिरीत उडी घेतली, मात्र पाणी कमी असल्याने तो वाचला. त्यानंतर रेल्वेखाली झोकून देऊन जीव देण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत पोलिसांनी त्याचा माग काढला आणि त्याला बेड्या ठोकल्या. आता पुढील तपास पोलीस निरीक्षक करीत आहेत.
Comments are closed.