डोंबिवलीत समस्यांची बजबजपुरी, फेरीवाल्यांनी फूटपाथ गिळले; शिवसेनेने उठवला आवाज
डोंबिवलीच्या पश्चिमेतील रस्त्याच्या दुतर्फा बेकायदा फेरीवाल्यांची बजबजपुरी वाढली आहे. या रस्त्यांवर फेरीवाले, भाजीवाले, पाणीपुरीवाले, वडापाव विक्रेते, चायनीजच्या गाड्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे येथून चालणेही मुश्कील झाले आहे. याविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शिष्टमंडळाने आवाज उठवला असून ठाण मांडून बसलेल्या बेकायदा फेरीवाल्यांवर कारवाई करा, अशी मागणी केली आहे.
डोंबिवली पश्चिमेतील सर्वच रस्त्यांवरील फूटपाथवर फेरीवाल्यांनी बस्तान मांडले आहे. तसेच दुकानदारांनी फूटपाथची जागा अडवून त्यावर सामान ठेवले आहे. फूटपाथवरील तुटक्या फुटक्या लाद्यांवरून चालताना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. शिवसेनेच्या शिष्टमंडळाने एच वॉर्डचे सहाय्यक आयुक्त अभिमान पवार यांची भेट घेतली आणि त्यांना या समस्यांचे फोटो आणि व्हिडीओ दाखवले. यावर लवकर तोडगा काढण्यासाठी सहाय्यक आयुक्तांना निवेदन देण्यात आले.
आठ दिवसांत कारवाई
सर्व समस्यांची दखल घेऊन येत्या आठ दिवसांत अतिक्रमण विभागासह कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन सहाय्यक आयुक्तांनी दिले. यावेळी शहरप्रमुख सुरेश परदेशी, शहर संघटक प्रियांका विचारे, उपशहरप्रमुख प्रमोद कांबळे, युवाधिकारी आदित्य पाटील, कार्यालय प्रमुख राजू पवार, विभागप्रमुख अनिल मुथा, शेखर चव्हाण, उपविभाग प्रमुख सुधाकर जाधव, सुभाष मोरे, संजीवन इंगळे, शाखाप्रमुख किरण म्हात्रे, अनिल विश्वकर्मा, योगेश कुबल, समीर सबनीस, तुकाराम सरकुंडे आदी उपस्थित होते.
Comments are closed.