Desi Mom Habits : आईच्या खजिन्यातील न फेकता येणाऱ्या वस्तू

भारतीय घरांमध्ये लहानपणी आई घर आवरत असताना तिच्या हातात एखादी जुनी डबी, प्लास्टिकची पिशवी, रिकामा डबा किंवा जुनं कापड दिसलं की आपण सहज म्हणायचो, आई हे आता कशाला ठेवायचं? पण आईचं ठरलेलं उत्तर असायचं, फेकू नको, नंतर कामी येईल. आणि गंमत म्हणजे ते नंतर कधी येतं, हे मात्र आईलाच माहीत असतं.

आईच्या घरातील जिव्हाळ्याच्या वस्तू

जुने आईस्क्रीमचे डबे
आईस्क्रीम संपलं म्हणजे डबा संपला, असं आईच्या शब्दकोशात नसतंच. त्यात कधी उरलेली भाजी ठेवली जाते, कधी पोळीचं पीठ, तर कधी फ्रीजमधल्या छोट्या वस्तू.

बिस्किटांचे टिन
बिस्किटांचा डबा संपला की त्यात बिस्किटे पुन्हा येतील अशी अपेक्षा करणे म्हणजे मोठी चूक. कारण तो डबा कधी शिवणकामाच्या साहित्याचा डबा होतो, कधी बटणं, सुया, दोरे ठेवण्याची जागा बनतो.

प्लास्टिकच्या पिशव्या
किराणा आणताना मिळालेली प्रत्येक पिशवी फेकून देण्यापेक्षा ती व्यवस्थित घडी करून ठेवण्याची कला आईला अवगत असते. अचानक काही सामान पॅक करायचं असेल किंवा कचरा वेगळा करायचा असेल, तेव्हा याच पिशव्या आठवतात.

जुनी साडी / ओढणी
जुनी साडी म्हणजे आईसाठी फक्त जुना कपडा नाही. त्यापासून पिशवी, उशीचं कव्हर, पडदा किंवा घरातील एखादं कामचलाऊ कापड तयार होऊ शकतं. काही साड्या तर फक्त आठवणींसाठीही जपून ठेवल्या जातात.

काचेच्या बरण्या
लोणचं संपलं, मसाला संपला किंवा एखादी बरणी रिकामी झाली तरी ती थेट कचऱ्यात जाणार नाही. ती धुवून स्वच्छ केली जाते आणि मग तिच्यात डाळी, मसाले, सुका खाऊ, नाणी किंवा स्वयंपाकघरातील एखाद्या छोट्या वस्तूला कायमचं घर मिळतं.

पहिल्या नजरेत ही सवय आपल्याला थोडी गंमतीशीर वाटते. पण आईला वस्तूची किंमत फक्त तिच्या सध्याच्या उपयोगावरून ठरवायची नसते. तिचा पुढे कधी उपयोग होईल, ती दुसऱ्या पद्धतीने वापरता येईल का आणि त्यासाठी पुन्हा पैसे खर्च करण्याची गरज आहे का, याचा विचार तिच्या मनात आधीच झालेला असतो.  म्हणूनच, आईच्या घरात रिकामे आईस्क्रीमचे डबे, बिस्किटांचे टिन, जुन्या साड्या आणि प्लास्टिकच्या पिशव्या वर्षानुवर्षे सांभाळून ठेवण्यामागे हीच मानसिकता असते.

Comments are closed.