Pandharpur News पदरमोड करून गावची वाट केली सुखकर

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

निकृष्ट कामे, ‘टक्केवारी ‘तील भ्रष्टाचार आणि विलंबाने होणारी विकासकामे हेच विषय सर्वत्र गाजत असताना याला छेद देत लोकप्रतिनिधी पदरमोड करून आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडतात तेव्हा ते खऱ्या अर्थाने जनतेच्या कौतुकास पात्र ठरतात.

पंढरपूर तालुक्यात सध्या संतोष बागल यांच्या कामाचे कौतुक होत आहे. बागल हे वाखरी जिल्हा परिषद गटाचे सदस्य आहेत. भीमा नदीला नुकत्याच आलेल्या पुरात तालुक्यातील पिराची कुरोली, आवे येथील बंधाऱ्याचे मातीचे भराव वाहून गेले. दोन गावांना जोडणाऱ्या बंधाऱ्याच्या रस्त्याचे भरावच वाहून गेल्याने, या मार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली. परिणामी विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबले, बाजारात जाणारा भाजीपाला, दूध बंद झाले. जनजीवन विस्कळीत झाल्याने शासनाने रस्ता पूर्ववत करून देण्याची मागणी वाढली.

शासकीय काम आणि सहा महिने थांब, या म्हणीप्रमाणे लोक चिंतेत असताना बागल हे आपल्या मतदारांच्या मदतीला धावून आले. स्वखर्चातून दहा टिपर, दोन जेसीबी आणि एका रोलरच्या साहाय्याने दगड आणि मुरुम टाकून रस्ता बागल यांच्या प्रयत्नातून पूर्ववत करण्यात आला. नैसर्गिक आपत्ती म्हणजे शासनाचे काम, शासनाने निधी द्यावा, शासनाने काम करावे, अशी लोकप्रतिनिधींची अपेक्षा असते. त्यात अनेक महिने निघून जातात. गैरसोयीमुळे मतदारांचे, सामान्य जनतेचे हाल होतात.

बागल याला अपवाद ठरले. शासकीय मंजुरीची अन् निधीची वाट न पाहता आपल्या भागातील लोकांची, विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करण्यासाठी त्यांनी पदरमोड केली. या रस्त्यामुळे परिसरातील वीसपेक्षा अधिक गावांच्या दळणवळणाचा प्रश्न मार्गी लागला. सामाजिक भान अन् निःस्वार्थी काम मतदारांना लोकप्रतिनिधींकडून अपेक्षित असते. या अपेक्षवर बागल हे खरे उतरले असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

Comments are closed.