सरफराज खान ठरला गेमचेंजर! स्लेजिंग करत श्रीलंकन फलंदाजांचे लक्ष केले विचलित अन् पडल्या विकेट्स, VIDEO पाहाच

कोलंबो येथे भारत आणि श्रीलंका यांच्यात मालिकेतील दुसरा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्याचा आज (मंगळवार, 25 ऑगस्ट) तिसरा दिवस असून भारताचा प्रभावी कामगिरी सूरूच आहे. दुखापतग्रस्त ऋषभ पंतच्या जागी बदली क्षेत्ररक्षक म्हणून सरफराज खान मैदानात उतरला. तो भारतासाठी सामना फिरवणारा खेळाडू ठरला.
शॉर्ट लेग आणि सिली पॉइंटला क्षेत्ररक्षण करताना सरफराज नेहमीप्रमाणेच उत्साही दिसला. त्याने केलेल्या सततच्या स्लेजिंगमुळे भारताला श्रीलंकेचे कर्णधार धनंजय डी सिल्व्हा आणि निरोशन डिकवेला यांच्या विकेट्स मिळाल्या.
क्षेत्ररक्षण करताना त्याने जवळपास प्रत्येक श्रीलंकन फलंदाजाशी संवाद साधला आहे. मानव सुथार गोलंदाजी करणार असताना धनंजय बाजूला सरकला, तेव्हा सरफराज त्याला म्हणाला,”भावा, तिथे काही नाहीये. सरळ बघ ना – तू डावीकडे आणि उजवीकडे का बघतोयस (लॉन्ग-ऑन आणि लॉन्ग-ऑफकडे बोट दाखवत)? तू फक्त वेळ वाया घालवतोयस, भावा. घाबरू नकोस. खेळ. तू कर्णधार आहेस. तू याचीच वाट बघत आहेस.”
काही वेळानंतर धनंजयची विकेट गेली. हे 35 व्या षटकात घडले. त्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर त्याने चौकार मारला आणि पुढच्या चेंडूसाठी अधिक वेळ घेतल्याने त्याला सरफराजने डिवचले. त्यानंतर त्या षटकातील पाचव्या चेंडूवर तो केएल राहुलला झेल देत बाद झाला.
या सामन्यात श्रीलंकेला कर्णधाराकडून चांगल्या खेळीची अपेक्षा होती, मात्र धनंजय 8 धावा करत तंबूत परतला. सुथारने टाकलेला चेंडू त्याच्या बॅटची कड घेत राहुलच्या हातात स्थिरावला.
डिकवेलाची विकेट
धनंजयनंतर पासिंदू सूरियाबंदाराचा अडसर रवींद्र जडेजाने दूर केला. तो 80 धावा करत बाद झाला. त्यानंतर विकेटकीपर निरोशन डिकवेला क्रीजवर आला, मात्र तो केवळ तीन चेंडू खेळून शून्यावर बाद झाला.
डिकवेला बाद होण्याआधी सरफराजने त्याला काहीतरी म्हटले. तेव्हा दोन्ही खेळाडूंच्या चेहऱ्यावर हास्य होते, मात्र शेवटी सरफराजने बाजी मारली. मोहम्मद सिराजच्या टाकलेल्या त्या 45 व्या षटकाच्या तिसऱ्या शॉर्ट बॉलवर डिकवेलाने बाजूला सारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू बॅटला हलकासा स्पर्श करून गेला आणि ध्रुव जुरेलने स्टम्पमागे एक उत्तम झेल घेतला.
Comments are closed.