W,W,W,W,W,W… 7 धावांत 6 विकेट्स; विराट कोहलीच्या ब्रँडचे शूज घालून पाकिस्तानी गोलंदाजाने रचला इतिहास

यंदाच्या महिला आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानच्या नशरा संधूने चमकदार कामगिरी करुन खास विक्रम नोंदवली. दुबईत हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात, या डावखऱ्या फिरकी गोलंदाजाने केवळ 7 धावा देत 6 विकेट्स घेतले. तिच्या उत्कृष्ट गोलंदाजीसमोर हाँगकाँगचा संपूर्ण संघ 19 षटकांत अवघ्या 71 धावांत गारद झाला. पाकिस्तानने हा सामना 72 धावांनी जिंकला आणि उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले.
मात्र, तिच्या गोलंदाजीपेक्षा तिने घातलेल्या बुटांनीच अधिक लक्ष वेधून घेतले. नशरा भारताचा दिग्गज खेळाडू विराट कोहलीच्या ‘One8’ ब्रँडचे बूट घालून मैदानात उतरली होती.
केवळ नशराच नाही, तर अनेक पाकिस्तानी महिला क्रिकेटपटू सामन्यादरम्यान ‘One8’ ब्रँडचे स्नीकर्स घातलेल्या दिसल्या. या खेळाडूंनी ‘One8 Cover Drive 18’ हे क्रिकेटचे बूट परिधान केले होते. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि त्यावरून मोठी चर्चा रंगली.
या स्पर्धेदरम्यान भारताची स्टार फलंदाज स्मृती मानधनाही याच ब्रँडचे स्नीकर्स घातलेली दिसली. तिला या ब्रँडची ‘ब्रँड ॲम्बेसेडर’ आणि ‘उत्पादन सह-निर्माती’ (product co-creator) म्हणून दीर्घकाळासाठी नियुक्त करण्यात आले आहे. मानधना अनेकदा ‘One8’ ची उत्पादने वापरताना दिसली आहे. यामध्ये ‘One8 Cover Drive’ क्रिकेट शूज आणि ‘SEAM XVIII Signature Edition’ स्नीकर्ससारख्या पादत्राणांचा समावेश आहे.
हाँगकाँगच्या डावादरम्यान, नशरा संधूने टाकलेल्या प्रत्येक षटकागणिक तिचे वर्चस्व वाढत गेले. तिने तिच्या दुसऱ्या षटकात एक बळी घेतला, तिसऱ्या षटकात दोन फलंदाजांना बाद केले आणि चौथ्या षटकात तीन बळी घेत सहा बळींचा टप्पा पूर्ण केला.
पाकिस्तानने 143 धावांचे लक्ष्य यशस्वीपणे राखण्यात तिच्या या शानदार गोलंदाजीने महत्त्वाची भूमिका बजावली. नशराची ही कामगिरी पाकिस्तानच्या महिला क्रिकेटसाठी ऐतिहासिक ठरली. महिला टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्याच्या एका डावात सहा बळी घेणारी ती पहिली पाकिस्तानी गोलंदाज ठरली.
Comments are closed.