माजी क्रिकेटपटू श्रीसंथवर कोसळला दु:खाचा डोंगर, वडिलांचे छत्र हरपले

भारताचा माजी क्रिकेटपटू एस श्रीसंथ याच्या वडिलांचे व्ही संथकुमारन नायर यांचे निधन झाले आहे. ते 89 वर्षांचे होते. कुटुंबियाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री कोची येथील एका खाजगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

पीटीआयला श्रीसंथच्या कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार, संथकुमारन कोचीमधील लिसी रुग्णालयात उपचार घेत होते आणि शुक्रवारी रात्री 9.45 वाजता त्यांचे निधन झाले. त्यांचे पार्थिव सध्या रुग्णालयाच्या शवागारात आहे. परदेशातून नातेवाईक आल्यावर रविवारी त्यांच्या पार्थिवाला कोट्टामंगलम येथील त्यांच्या वडिलोपार्जित घरी नेण्यात येईल आणि तेथे त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात येईल.

रविवारी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत संथकुमारन यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. सायंकाळी 4 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येतील.

क्रिकेटविश्वात श्रीसंथची ओळख
श्रीसंथ 2007 टी20 विश्वचषक आणि 2011 चा एकदिवसीय विश्वचषक विजयी संघांचा भाग राहिला आहे. त्याने भारताचे तिन्ही प्रकारच्या सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केले आहे.

वेगवान गोलंदाजाने भारतासाठी 27 कसोटी सामन्यांमध्ये 87 विकेट्स, 53 एकदिवसीय सामन्यांमध्ये 75 विकेट्स आणि 10 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 7 विकेट्स घेतल्या आहेत.

तसेच श्रीसंथ तीन आयपीएल संघांकडून खेळला आहे. त्याने 44 आयपीएल सामन्यांमध्ये 40 विकेट्स घेतल्या. त्याने स्थानिक स्पर्धांमध्येही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्याने 74 प्रथम श्रेणीच्या सामन्यांत 213 विकेट्स आणि 92 लिस्ट ए च्या सामन्यात 124 विकेट्स घेतल्या.

श्रीसंथवर आयपीएलदरम्यान मॅच फिक्सिंगचा आरोप लावण्यात आला होता. 2015 मध्ये न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्कता केली होती, मात्र त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट किंवा आयपीएलमध्ये पुनरागमन करता आले नाही. त्यानंतर त्याने 2022 मध्ये क्रिकेटच्या सर्व प्रकारामधून निवृत्ती घेतली. (Tragedy strikes former Indian cricketer S Sreesanth Father V Santhakumaran Nair died)

Comments are closed.