अपघातग्रस्तांसाठी शिवसेनेची मदत, विनायक राऊत यांच्या कडून माणुसकीचा हात
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार मा. विनायकजी राऊत यांचा आज रत्नागिरी जिल्हा दौरा विविध सामाजिक व पक्षीय कार्यक्रमांनी गजबजलेला होता. सांत्वनपर भेटी, सौरपथदिवे लोकार्पण आणि स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शाळांमध्ये साहित्य वाटप अशा विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावल्यानंतर परतीच्या प्रवासात वांद्री येथे दोन एर्टिगा व एका महिंद्रा पिकअपचा विचित्र अपघात त्यांच्या निदर्शनास आला.
क्षणाचाही विलंब न करता राऊत यांनी आपले वाहन थांबवले. अपघातग्रस्त वाहनातील कुटुंबीयांची आस्थेने विचारपूस केली. एका व्यक्तीला दुखापत झाल्याचे लक्षात येताच त्याच्यावर तातडीने प्राथमिक उपचार करण्याच्या सूचना दिल्या. अपघातामुळे हादरलेल्या कुटुंबीयांना धीर देत, त्यांची परिस्थिती समजून घेतली आणि केवळ चौकशी करून निघून न जाता पुढील प्रवासाचीही व्यवस्था केली.
सांताक्रुझहून गणेशोत्सवासाठी कणकवलीकडे निघालेले हुमरड गावातील सावंत कुटुंब अपघातामुळे मोठ्या संकटात सापडले होते. वाहनाचे मोठे नुकसान झाले होते, मात्र सुदैवाने जीवितहानी झाली नाही. अशा प्रसंगी राजकीय पदापेक्षा माणुसकीचे नाते महत्त्वाचे असते, हे राऊत यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले. तसेच उपजिल्हाप्रमुख रविंद्र डोळस यांच्या वाहनातून अपघातग्रस्त दांपत्याला त्यांच्या सामानासह कणकवली येथील उमरठ गावी सुखरूप रवाना करण्यात आले. घटनास्थळी पोलीस हजर होते.
राजकारणाच्या व्यस्त दौऱ्यातही संकटात सापडलेल्या अनोळखी नागरिकांसाठी आपला प्रवास थांबवून त्यांना आधार देणे, हीच खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधित्वाची माणुसकीची बाजू आहे. अपघाताच्या धक्क्याने अस्वस्थ झालेल्या त्या कुटुंबासाठी त्या क्षणी विनायक राऊत यांची भेट केवळ मदत नव्हती, ती संकटाच्या वेळी मिळालेली धीराची आणि माणुसकीची साथ होती.यावेळी जिल्हाप्रमुख दत्ताजी कदम, उपजिल्हाप्रमुख रविंद्र डोळस, गणेशभाई बाईंग, अनिकेत करमरकर, दिनेश देसाई आदी उपस्थित होते.
Comments are closed.