अनंत नाग दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित.
दिग्गज अभिनेत्याच्या कारकीर्दीचा गौरव : कार्तिक आर्यन सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा मानकरी : यामीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार
सर्कल इन्स्टिट्यूट, केवडिया
गुजरातच्या केवडिया येथील एकता नगरमध्ये पार पडलेल्या 72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात दिग्गज अभिनेते अनंत नाग यांना दादासाहेब फाळके या चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अनुभवी कन्नड अभिनेता अनंत नाग यांना हा सन्मान 5 दशकांपेक्षा अधिक काळाच्या कारकीर्दीत भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी मिळाला आहे. कन्नड, हिंदी आणि अन्य भारतीय भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केलेले अनंत नाग यांना 2025 साली पद्मश्रीने गौरविण्यात आले होते. अनंत नाग यांनी विविध भाषांमधील 300 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
एक अभिनेता म्हणून माझी कामगिरी तुम्ही पाहिली आहे. परंतु बालपणातील 12 वर्षे मी आश्रमात घालविली, त्यानंतर मला मुंबई येथे पाठविण्यात आले, जेथे चैतन्य महाप्रभू नाटकात अभिनय करण्याची संधी मला मिळाली. त्यावेळी कारकीर्द काय असते, हे कुणालाच ठाऊक नव्हते. पोटासाठी कारकीर्द सुरू केली आणि मग 5 वर्षांमध्ये 50 नाटकांमध्ये काम केले. मागील 50 वर्षांमध्ये मला विविध भाषांमधील चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी बोलाविण्यात आले. मी इतर भाषांमधील चित्रपटही केले. परंतु कर्नाटक आणि कन्नड चित्रपटांमध्ये मला सर्वात मोठ्या संधी मिळाल्याचे उद्गार अनंत नाग यांनी काढले आहेत.
चित्रपटसृष्टीशी निगडित प्रत्येकाचा सन्मान
मागील वर्षी मला पद्मभूषण पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते मिळाला आणि यंदा मला चित्रपटसृष्टीचा हा सर्वात मोठा पुरस्कार राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्तेच मिळाला, यामुळे मी स्वत:ला भाग्यशाली समजतोय. माझ्यासोबत अभिनयाच्या 55 वर्षांयच कारकीर्दीत राहिलेल्या काही लोकांचे मी स्मरण करू इच्छितो. हा पुरस्कार केवळ माझ्यासाठी नव्हे, हा प्रत्येक निर्माता, दिग्दर्शक, संवादलेखक, गीतकार, मेकअप आर्टिस्ट, सहाय्यक दिग्दर्शकासाठी आहे. हा पुरस्कार माझ्यासाठी स्वत:च्या मनात स्थान निर्माण करणाऱ्या लाखो लोकांसाठी असल्याचे अनंत नाग यांनी म्हटले आहे.
कार्तिक-यामी गौतमचा अभिमान
कार्तिक आर्यनला ‘चंदू चॅम्पियन’ आणि मामूटी यांना ‘ब्रह्मयुग’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तर यामी गौतमला ‘आर्टिकल 370’ चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. ‘श्रीकांत’ हा सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट तर ‘आर्टिकल 370’ सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म पुरस्काराचा मानकरी ठरला. तमिळ अभिनेता धनुषला दोन श्रेणींमध्ये राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
हानिकारक गोष्टींचा प्रचार करू नका!
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या प्रत्येक ज्युरी पॅनेलमध्ये महिलांची भागीदारी सुनिश्चित केली जावी असे मी इच्छिते. चित्रपट कलाकार अत्यंत लोकप्रिय असतात, त्यांच्यात देशवासीय विशेषकरून युवांना प्रभावित करण्याची क्षमता असते. लोकप्रिय कलाकारांनी आरोग्यासाठी हानिकारक पदार्थांच्या जाहिराती करू नयेत अशी मी विनंती करू इच्छिते. जो अंधकार नव्हे प्रकाश पसरवितो तोच स्टार असे उद्गार राष्ट्रपती मुर्मू यांनी सोहळ्याला संबोधित करताना काढले आहेत.
Comments are closed.