Asian Games 2026 Badminton: भारतीय पुरुषांचे पदक पक्के, महिला संघ उपांत्यपूर्व फेरीतूनच स्पर्धेबाहेर

मंगळवारी (22 सप्टेंबर) झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात यजमान जपानला पराभूत करून भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने 2026 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील आपले पदक निश्चित केले.

मागील स्पर्धेत, 2023 हांगझू येथे रौप्य पदक जिंकलेल्या भारतीय पुरुष संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. यामुळे त्यांचे सलग दुसऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत किमान एक कांस्य पदक पक्के झाले आहे.

या स्पर्धेत जेव्हा भारताला ज्याची सर्वाधिक आवश्यकता होती, त्या लक्ष्य सेनने जबरदस्त कामगिरी केली. दुखापत आणि मागील अनेक सामन्यांमध्ये खराब फॉर्मशी झुंज देत त्याने आपल्या सर्वोत्तम पुनरागमनांपैकी एक केले. जागतिक क्रमवारीत 14 व्या स्थानावर असलेल्या लक्ष्यने, सलामीच्या एकेरी सामन्यात जागतिक क्रमवारीत 7 व्या स्थानावर असेलल्या कोडाई नाराओकावर 11-21, 21-5, 21-19 असा विजय मिळवत भारताला आघाडी मिळवून दिली.

लक्ष्यनंतर आशियाई क्रीडा स्पर्धेतील पुरुष दुहेरीत सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी पुन्हा एकदा चांगली कामगिरी केली. त्यांनी 2021 चे विश्वविजेते ताकुरो होकी आणि युगो कोबायाशी याच्यावर 21-18, 24-22 असा विजय मिळवत भारताची आघाडी 2-0 केली.

यंदाच्या बॅडमिंटन आशिया अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचलेल्या आयुष शेट्टीने जागतिक क्रमवारीत 16 व्या क्रमांकावर असलेल्या कोकी वातानाबे याच्यावर 21-10, 21-19 असा विजय मिळवला. यामुळे भारताचा विजय आणि पदक निश्चित झाले.

उपांत्य फेरीत भारतासमोर चीनचे आव्हान असणार आहे. चीनने कोरियाचा 3-2 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

भारतीय महिला संघाची मात्र निराशा झाली. त्यांना जपानकडून उपांत्यपूर्व फेरीत 3-1 असा पराभवाचा सामना करावा लागला. दोन वेळेची ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधूने एकेरीमध्ये तीन वेळेच्या विश्वविजेत्या अकाने यामागुचीला पहिल्या गेममध्ये चांगली झुंज देत 23-21 असा विजय मिळवला, मात्र अखेरीस ती 23-21, 18-21, 11-21 अशी पराभूत झाली.

युवा उन्नती हुडा ही तोमोका मियाझाकीविरुद्ध 21-16, 21-18 अशी पराभूत झाली. यामुळे जपानने 2-0 अशी आघाडी घेतली. या सामन्यात भारताचे आव्हान कायम राखण्याचा प्रतत्न ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी केला.

भारतीय जोडीने जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या युकी फुकुशिमा आणि मायु मात्सुमोतो यांना 21-16, 21-17 असे पराभूत केले. यामुळे सामना 2-1 असा झाला होता.

चौथ्या सामन्यात मात्र जपानने बाजी मारली. नोझोमी ओकुहाराने चौथ्या सामन्यात तन्वी शर्माला 21-12, 21-10 असे पराभूत करत जपानचे उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले.

Comments are closed.