रायगड झेडपी अध्यक्षांच्या पीएला लाच घेताना अटक, शिक्षिकेच्या बदलीसाठी हॉटेलमध्ये दीड लाखाची रोकड स्वीकारताना अँटी करप्शनची धाड
रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष भाजपचे मंगेश वाकडीकर यांचे स्वीय सचिव (पीए) योगेश भस्मे यांना दीड लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज रंगेहाथ पकडले. एका शिक्षिकेची बदली करण्यासाठी भस्मे याने तिच्या पतीकडे दीड लाख रुपये लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी तक्रार झाल्यानंतर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी एका हॉटेलमध्ये सापळा रचून भस्मे याला लाच घेताना अटक केली. भस्मे हा अर्थ विभागात सहाय्यक लेखा अधिकारी म्हणून काम करतो. त्याच्याकडे भाजपचे झेडपी अध्यक्ष वाकडीकर यांच्या स्वीय सचिव पदाचीही जबाबदारी देण्यात आली आहे. भस्मे याने ही लाच नेमकी कोणासाठी घेतली, अशी चर्चा सध्या जिल्हा परिषद वर्तुळात सुरू आहे.
रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेतील एका शिक्षिकेची बदली करण्यासाठी तिचे पती अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांचा स्वीय सचिव योगेश भस्मे याच्याकडे आले होते. त्याने या बदलीसाठी दीड लाख रुपयांच्या लाचेची मागणी शिक्षिकेच्या पतीकडे केली. तसेच लाचेची रक्कम घेऊन शहरातील एका हॉटेलमध्ये बोलावले. या लाचखोरीची तक्रार शिक्षिकेच्या पतीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात केली. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उपअधीक्षक सरिता भोसले, पोलीस निरीक्षक निशिकांत धनावडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अरुण करकरे, सुषमा राऊळ, परम ठाकूर, नवदीप नांदगावकर यांच्या पथकाने हॉटेलमध्ये सापळा रचला.
प्रशासनाच्या अडचणी वाढल्या
अधिकाऱ्यांनी टक्केवारीमध्ये अवाच्यसवा वाढ केल्याचा आरोप विकासकामे करणाऱ्या ठेकेदारांनी केला आहे. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासन संशयाच्या भोवऱ्यात अडकलेले असताना झेडपी अध्यक्षांच्या सचिवाला दीड लाखाची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. त्यामुळे प्रशासनाच्या अडचणी वाढल्या आहेत. भस्मे याने लाचेची रक्कम स्वतःसाठी घेतली की यामध्ये अन्य काही अधिकाऱ्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा सहभाग आहे, याचाही शोध पोलीस करीत आहेत.
– ठरलेल्या वेळेनुसार भस्मे हा आज सायंकाळी ४ वाजून २५ मिनिटांनी हॉटेलमध्ये आला. त्याने शिक्षिकेच्या पतीकडून दीड लाख रुपयांची रोकड स्वीकारली. त्यावेळी हॉटेलमध्ये दबा धरून बसलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी त्याच्यावर झडप घातली.
– दीड लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्याला नजीकच्या पोलीस ठाण्यात नेले. रात्री उशिरापर्यंत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. यापूर्वीही भस्मे याने याच पद्धतीने लाचखोरी केली आहे का, याचाही कसून शोध एसीबीने सुरू केला आहे.
– जिल्हा परिषद अध्यक्षांच्या स्वीय सचिवाला दीड लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडल्यामुळे राजकीय तसेच प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे झेडपीमधील लाचखोर कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
Comments are closed.