Pune News – फटाक्यांच्या आतषबाजीत तब्बल 19 तास रंगला जेजुरीचा मर्दानी दसरा
>>प्रकाश खाडे<<
विजयादशमीदिवशी सुरू झालेला जेजुरीचा दसरा सोहळा तब्बल १९ तासांनी संपला, सायंकाळी ६ वाजता खंडोबा गडातून देवांची पालखी वाजत-गाजत भेटाभेट सोहळ्यासाठी काढण्यात आली, तर कडेपठारच्या डोंगरातील पालखी रात्री ९ वाजता निघाली. मध्यरात्रीचे चांदणे, गार वाऱ्याची झुळूक, आकाशाकडे झेपावणाऱ्या विविध रंगाच्या हवाई तोफा, फटाक्यांचा आवाज, भाविकांच्या भक्ती प्रेमाला आलेले उधाण, सदानंदाचा येळकोट असा होणारा जयघोष अशा भारलेल्या वातावरणात कडेपठारच्या डोंगरदरीतील रमणा या ठिकाणी रात्री २ वाजता खंडोबा देवाच्या दोन्ही पालख्यांची भेटा भेट झाली. हा सोहळा अनुभवण्यासाठी हजारो भाविक रात्रभर डोंगरात जागे होते.
दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी खंडोबा गडामध्ये खंडा उचलणे स्पर्धा झाल्यावर तब्बल १९ तासांनी दसरा सोहळ्याची सांगता झाली. दसऱ्यादिवशी सायंकाळी ६ वाजता मुख्य पेशवे इनामदार यांनी सूचना केल्यावर घडशी समाजातील कलावंतांनी पारंपारिक वाद्य वाजवून शेडा दिला. खांदेकरी मानकरी यांनी पालखी खांद्यावर उचलून घेतली. पालखीमध्ये खंडोबा म्हाळसादेवीच्या मूर्ती ठेवून पालखी वाजत गाजत डोंगरामध्ये निघाली. यावेळी श्री मार्तंड देवसंस्थानचे मुख्य विश्वस्त ॲड विश्वास पानसे, विश्वस्त मंगेश घोणे, ॲड.पांडुरंग थोरवे, अनिल सौंदडे, अभिजीत देवकाते, पोपट खोमणे, व्यवस्थापक आशिष बाठे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदानंदाचा येळकोट असा जयघोष करीत यावेळी पालखीवर भंडार खोबरे व आपट्याच्या पानांची मुक्त उधळण करण्यात आली. नंतर पालखी गडाला वळसा मारून डोंगरदरीमध्ये असलेल्या रमणा या ठिकाणी नेण्यात आली. कडेपठारच्या डोंगरातील मूळ ठिकाणच्या खंडोबा मंदिरातून रात्री ९ वाजता सनई, ढोल, शंख, डमरू, संबळ, ताशा आदी पारंपारिक वाद्याच्या तालामध्ये भेटीसाठी निघाली. यावेळी पेटविलेल्या दिवट्या, हवाई नळे यांच्या उजेडात पालखी डोंगरातील चढउतार, अवघड उंचवटे पार करीत पुढे सरकत होती. वाटेतील सुसरटिंगी ही अवघड टेकडी पार करताना पालखीच्या खांदेकार्यांचे कसब पणाला लागले. या ठिकाणी मानवी हातांची साखळी करून पालखीला वर ओढून घ्यावे लागले. अत्यंत खडतर व कठीण प्रवास करीत पालखी भेटा भेट सोहळ्याच्या ठिकाणी उंचावर रात्री १ वाजता पोहोचली.
यानंतर येथून हजारो भाविक खाली दरीत उतरले. परंपरेप्रमाणे दोन्ही पालख्यांच्या मूर्ती मागे नाभिक समाजातील मानकरी मोठा आरसा धरतात. दोन्ही पालख्यातील अंतर खूप असते, यावेळी हवाई नळे, भुईमुळे उडवून उजेड केला जातो, या उजेडामध्ये दोन्ही आरशात मूर्तींचे मुखदर्शन झाल्यानंतर भेटा भेट झाल्याचे जाहीर केले जाते. आज रात्री २ वाजता भेटा भेट झाल्यानंतर जमलेल्या भाविकांनी भंडाऱ्याची उधळण करीत “येळकोट येळकोट जय मल्हार” असा जयघोष केला. या आवाजाने साऱ्या दर्या खोऱ्याला जाग आली.
वाटेत आपट्याच्या झाडाचे पूजन केल्यावर सकाळी ७ वाजता पालखी खंडोबा गडामध्ये आली. रात्रभर सारी जेजुरी नगरी जागीच होती. गडामध्ये पालखी आल्यानंतर स्थानिक कलावंतांनी देवासमोर गायन व नृत्य केले. पालखी नाचवण्यात आली. नंतर भंडार घरामध्ये सर्वांना रोज मोरा (ज्वारी) वाटण्यात आला.
खंडा उचलणे स्पर्धेत अंकुश गोडसे सर्वप्रथम

ऐतिहासिक एक मण (४०किलो) वजनाचा पोलादी खंडा जास्त वेळ उचलून धरण्याच्या स्पर्धेत अंकुश गोडसे याचा प्रथम क्रमांक आला. त्याने १४ मिनिटे ५ सेकंद एका हातात खंडा उचलून धरला, तर विशेष खंडा कसरतीमध्ये नितीन कुदळे याचा प्रथम क्रमांक आला. या दोघांना श्री मार्तंड देव संस्थानतर्फे तर्फे प्रत्येकी ५१ हजार रुपये रोख पारितोषक देण्यात आले. याशिवाय सरदार पानसे यांच्या वंशजांच्या वतीने उद्योजक मल्हार पानसे यांनी दोन्ही विजेत्यांना प्रत्येकी २०० ग्रॅम वजनाची चांदीची कडी भेट दिली.
खंडा उचलणे स्पर्धेत अमोल खोमणे (द्वितीय) हेमंत माने (तृतीय) मंगेश चव्हाण (चतुर्थ ) कुणाल खोमणे, सुहास खोमणे, गिरीश घाडगे, शुभम कारकूड विजेते ठरले.
खंडा कसरत स्पर्धेमध्ये अक्षय गोडसे, शिवम कुदळे, शिवा राणे, विशाल माने, सचिन कुदळे, सौरभ सकट, शुभम कारकूड यांना बक्षिसे देण्यात आली.

दोन्ही स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक (५१ हजार) द्वितीय क्रमांक (३५ हजार) तृतीय क्रमांक(२५ हजार) चतुर्थ क्रमांक (२० हजार) पाचवा क्रमांक (१० हजार) व उत्तेजनार्थ (५ हजार ) अशी बक्षिसे व सन्मानचिन्ह देण्यात आली. खंडा कसरतीमध्ये तरुणांनी विविध प्रकारच्या कसरती केल्या. दातामध्ये धरून खंडा उचलणे, खंडा युद्धासारखा गोल फिरवणे, हातात धरून उठाबशा काढणे, अशा चित्तथरारक कसरती पाहताना उपस्थितांचे श्वास रोखले गेले.
मर्दानी दसरा नाव का पडले
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी एकदा रात्रभर डोंगरात जागून दसरा सोहळ्याचा आनंद घेतला, पेटविलेल्या दिवट्या, हवाई नळे यांच्या उजेडातच रात्रभर डोंगरात सोहळा चालला, पाऊसही होता. सकाळी होणारी खंडा उचलणे स्पर्धा, त्यामध्ये सहभागी होणाऱ्या तरुणांकडून केल्या जाणाऱ्या कसरती हे सर्व पाहिल्यानंतर बाबासाहेब म्हणाले हा साधासुधा दसरा नाही, शिवशाहीची आठवण करून देणारा हा तर “मर्दानी दसरा” आहे. त्या वेळेपासून जेजुरीच्या दसऱ्याला “मर्दानी दसरा” असे संबोधले जाऊ लागले.
जेजुरीच्या दसऱ्यावर दुष्काळाचा परिणाम, भाविकांच्या संख्येत मोठी घट
दरवर्षी जेजुरीच्या दसरा सोहळ्याला पुणे, मुंबई ,नगर, नाशिक आदी भागातून हजारो भाविक येतात. मात्र यंदा दसरा सोहळ्याला ग्रामस्थ उपस्थित होते, मात्र भाविकांची संख्या अत्यंत नगण्य होती. राज्यातील दुष्काळी परिस्थिती, भडकलेली महागाई याचा परिणाम दसरा सणावर जाणवला. राज्यभरातून भाविक न आल्याने व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर नाराजी जाणवली.
Comments are closed.