Stock Market News – शेअर बाजारात आतषबाजी! सेन्सेक्स 1400, निफ्टी 400 अंकांनी वधारला; गुंतवणूकदारांना 10 कोटींचा फायदा
दिवाळीच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात जोरदार तेजी पाहायला मिळाली आहे. अमेरिकेत झालेल्या मध्यावधी निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा दारूण पराभव झाला. त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी हिंदुस्थानी शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली असून मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 1400 अंकांनी, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 400 अंकांनी वधारला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना जवळपास 10 लाख कोटींचा फायदा झाला आहे.
गुरुवारी सकाळी व्यवहार सुरू होताच सेन्सेक्स 1,429.55 अंकांची म्हणजेच 1.85 टक्क्यांची वाढ नोंदवत 78,730.95 अंकांवर उघडला. तर निफ्टी-50 मध्ये 403.55 अंकांची म्हणजेच 1.68 टक्क्यांची वाढ होऊन तो 24,364.15 अंकांवर पोहोचला. सुरुवातीच्या व्यवहारात बाजारातील बहुतांश शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळाली. त्यामुळे एकूण 2,099 शेअर्स वधारले, तर 397 शेअर्स घसरले. 107 शेअर्सच्या किमतीत कोणताही बदल झाला नाही.
बातम्यांचा इशारा! सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स 1,403.71 अंकांनी 78,689.87 वर गेला; निफ्टी 378.85 अंकांनी वाढून 24,340.40 वर पोहोचला. https://t.co/LsfgWvp9bZ
— प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया (@PTI_News) 5 नोव्हेंबर 2026
तुफान तेजीमुळे बीएसईवर सूचिबद्ध असलेल्या सर्व कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल मागील सत्रातील 4,90,48,312 कोटी रुपयांवरून वाढून 5,00,14,734 कोटी रुपयांवर पोहोचले. यामुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 9.66 लाख कोटी रुपयांची वाढ झाली. बाजारातील तेजीचा परिणाम ऑटो, सिमेंट आणि बँकिंग क्षेत्रातही दिसून आला. सिमेंट क्षेत्राचा निर्देशांक 2.84 टक्क्यांनी, तर निफ्टी ऑटो निर्देशांक 2.40 टक्क्यांनी वधारला.
निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये 2.38 टक्के, निफ्टी रिअल्टीमध्ये 2.16 टक्के आणि निफ्टी प्रायव्हेट बँक निर्देशांकात 1.94 टक्क्यांची वाढ झाली. निफ्टी बँक निर्देशांकही 1.83 टक्क्यांनी वधारून 56,937.50 अंकांवर पोहोचला. याशिवाय निफ्टी आयटीमध्ये 1.78 टक्के, मीडिया क्षेत्रात 1.62 टक्के आणि मेटल क्षेत्रात 1.12 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. मात्र, निफ्टी फार्मा आणि हेल्थकेअर निर्देशांकात अनुक्रमे 0.20 आणि 0.33 टक्क्यांची किरकोळ घसरण झाली.
तेजीचे कारण काय?
आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किंमती 100 डॉलरच्या खाली आल्या आहेत. सध्या कच्चे तेल प्रति बॅरल 94 डॉलरवर आले आहे. अमेरिकेत झालेल्या मध्यावधी निवडणुकीत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाचा दारूण पराभव झाला. त्यानंतर अमेरिका आणि इराणमधील संघर्ष कमी होण्याची शक्यता आहे. याचाच परिणाम कच्च्या तेलाच्या किंमतींवर झाला.
Comments are closed.