गोकुळची लढाई आता कोर्टात आणि रस्त्यावर! दूध संघाच्या सत्तेसाठी भाजपने जनादेश धुडकावला; कोल्हापुरात सोमवारी संघर्ष मोर्चा
निवडणुकीच्या माध्यमातून जिंकता न आलेला गोकुळ दूध संघ जनादेश धुडकावून ताब्यात घेण्याचा डाव भाजपने टाकला आहे. त्यासाठी सहकारी संस्था कायद्यात सत्ताधाऱ्यांना सोयीस्कर बदल करण्यात आला आहे. या राजकारणाचे तीव्र पडसाद राज्यात उमटले आहेत. काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी सरकारच्या या निर्णयाविरोधात आज लढय़ाची हाक दिली. गोकुळ वाचवण्यासाठी न्यायालयात आणि रस्त्यावरही लढणार असून कोल्हापुरात सोमवारी भव्य संघर्ष मोर्चा काढण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी केली.
मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सतेज पाटील यांनी सरकारच्या कटकारस्थानी कारभाराची चिरफाड केली. ‘नव्या कायद्यातून साखर कारखाने व जिल्हा बँकांना वगळण्यात आले आहे, फक्त गोकुळची सत्ता मिळवण्यासाठीच कायद्यात बदल करण्यात आला आहे. गोकुळ अमूलच्या घशात घालण्याचा डाव आहे, असा आरोप त्यांनी केला. भाजप सहकार क्षेत्रात चुकीचा पायंडा पाडत आहे. नवा कायदा गोकुळपुरता मर्यादित राहणार नाही. उद्या तो कोणत्याही संस्थेसाठी लागू केला जाऊ शकतो, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. निवडणूक झाल्यानंतर कायदा आणून तो पूर्वलक्षी प्रभावाने कसा काय लागू होतो, असा सवालही त्यांनी केला. गोकुळमध्ये सरकारी संचालक घुसवण्याच्या निर्णयाविरोधात 9 नोव्हेंबरला कोल्हापुरातील दसरा चौकापासून जिल्हाधिकारी कचेरीपर्यंत भव्य मोर्चा काढण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे यांचा सतेज पाटलांना फोन
गोकुळ वाचवण्याच्या लढाईत शिवसेनाही उतरली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज सतेज पाटील यांना फोन करून त्यांच्यासोबत चर्चा केली. या लढाईत शिवसेना खांद्याला खांदा लावून तुमच्यासोबत राहील, अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी दिली.
राहुल गांधी यांची पोस्ट… जनादेशात भेसळ!
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ‘एक्स’ पोस्ट करत निशाणा साधला. गोकुळ निवडणुकीत शेतकऱ्यांनी भाजपचा पराभव केला. हा पराभव भाजपला पचवता आलेला नाही. त्यांनी निवडणुकीनंतर नियम बदलून टाकले आणि स्वतःच्या चार संचालकांना घुसवून 12 सदस्यांची संख्या 16 वर नेली. बहुमत चोरले. ही जनादेशामध्ये केलेली भेसळ आहे. शेतकरी ही मतचोरी विसरणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
Comments are closed.