मुश्रीफांची फाईल ईडीने केली बंद!
गोकुळ दूध संघातील अध्यक्ष निवडीवरून वाद सुरू असतानाच अजितदादा गटाचे नेते व मंत्री हसन मुश्रीफ यांना पीएमएलए कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. हसन मुश्रीफ व त्यांच्या दोन मुलांविरोधात मनी लॉण्डरिंगच्या गुह्याप्रकरणी ईडीने न्यायालयात दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट पीएमएलए कोर्टाने स्वीकारला आहे. हा अहवाल स्वीकारतानाच संबंधित मूळ गुन्हेच मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केल्याने मनी लॉण्डरिंगचा गुन्हाही टिकू शकत नसल्याचे निरीक्षण विशेष न्यायालयाने नोंदवले.
कोल्हापूरमधील सरसेनापती संताजी घोरपडे शुगर फॅक्टरीला अनेक संशयास्पद कंपन्यांकडून इक्विटी आणि प्रेफरन्स शेअर्सच्या माध्यमातून कोटय़वधी रुपये मिळाले होते. 11.35 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक आर्थिक विवरणपत्रांमध्ये दाखवण्यात आली होती, मात्र त्यासंबंधी बँक व्यवहारांचा तपशील उपलब्ध नव्हता. कंपनी नोंदणी कार्यालयाने दाखल केलेली तक्रार आणि कोल्हापूरच्या मुरगूड पोलीस ठाण्यात दाखल झालेला एफआयआर या मूळ गुह्यांच्या आधारे ईडीने हसन मुश्रीफ व त्यांच्या मुलांविरोधात तपास सुरू केला तसेच या प्रकरणात ईडीने ईसीआयआर दाखल केला होता.
Comments are closed.