राहुल गांधींनी मोदींना पुन्हा एकदा चर्चेचे आव्हान दिले आहे
दिमागी नक्षलवादी’ संबोधल्याने संताप व्यक्त
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी छत्तीसगडमधील बस्तर येथे सीआरपीएफ जवानांसोबत दिवाळी साजरी केली होती. विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी सोमवारी पंतप्रधानांच्या दौऱ्यावर निशाणा साधला. याचदरम्यान राहुल गांधींनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खुल्या चर्चेसाठी आव्हान दिले. ‘दिमागी नक्षलवादी’, ‘राष्ट्रविरोधी’ आणि ‘परकीय शक्तींच्या सांगण्यावरून काम करत असल्याच्या’ आरोपांना प्रत्युत्तर म्हणून त्यांनी हे आव्हान दिले. पंतप्रधानांना चर्चेसाठी दिलेले त्यांचे आव्हान अजूनही कायम आहे आणि ते या विषयावर कधीही चर्चा करण्यास तयार असल्याचे राहुल गांधी म्हणाले. यावेळी ‘दिमागी नक्षलवादी’ असा शब्दप्रयोग पंतप्रधानांनी केल्यावरूनही राहुल गांधींनी संताप व्यक्त केला.
आपले आव्हान पुन्हा एकदा अधोरेखित करत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला. खरा राष्ट्रविरोधी कोण आहे आणि परकीय शक्तींच्या सांगण्यावरून कोण काम करत आहे, यावर पंतप्रधानांनी त्यांच्याशी चर्चा करावी, मी चर्चेसाठी कधीही आणि कुठेही सज्ज असल्याचे ते म्हणाले. ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील एका पोस्टमध्ये राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा हे आव्हान दिले आहे.
Comments are closed.