हिंदुस्थानची फायनलमध्ये एंट्री; उपांत्य फेरीत अफगाणिस्तानचा उडवला धुव्वा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

हिंदुस्थानच्या संघाने 19 वर्षांखालील आशिया कपच्या अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. हिंदुस्थानने उपांत्य फेरीचा सामना अफगाणिस्तानविरुद्ध 8 विकेट्स राखून सहजपणे जिंकला. अल अमिरात क्रिकेट मैदानावर प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने 8 फलंदाज गमावून 227 धावा केल्या. हिंदुस्थानी संघाने स्पह्टक फलंदाजीच्या जोरावर 37 व्या षटकात सामना जिंकला. आता हिंदुस्थानचा संघ अंतिम फेरीत पाकिस्तानचा सामना करेल. गट फेरीत पाकिस्तानने हिंदुस्थानला पराभूत केले होते. 14 नोव्हेंबरला हिंदुस्थानला पाकिस्तानवर सूड उगवण्याची संधी मिळेल.

आर्यवीर सेहवागसह तीन फलंदाजांची अर्धशतके

हिंदुस्थानच्या संघासाठी कर्णधार लक्ष्य रायचंदानी, आर्यवीर सेहवाग आणि व्ही. के. विनीत यांनी अर्धशतके झळकावली. दोन्ही सलामीवीरांनी शानदार सुरुवात केली. आर्यवीर आणि लक्ष्य यांनी पहिल्या विकेटसाठी 102 चेंडूंमध्ये 117 धावांची भागीदारी केली. 56 चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केल्यानंतर पुढच्याच चेंडूवर आर्यवीर बाद झाला. ज्युनियर सेहवागने चार चौकार आणि तितक्याच षटकारांसह 51 धावा केल्या.

कर्णधार लक्ष्यचे शतक हुकले, त्याने 90 चेंडूंमध्ये 93 धावा केल्या. तिसऱया क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या विनीतने पाच चौकार आणि एका षटकारासह 62 चेंडूंमध्ये नाबाद 57 धावांची खेळी केली. या तिघांच्या फलंदाजीच्या जोरावर हिंदुस्थानने हा सामना सहजपणे खिशात टाकला.

हिंदुस्थानची गोलंदाजी ठरली घातक

साखळी फेरीतील तिन्ही सामने जिंकून उपांत्य फेरीत पोहोचलेला अफगाणिस्तान संघ कोणताही विशेष प्रभाव पाडू शकला नाही. या गोष्टीला कारण ठरली ती हिंदुस्थानची अचूक आणि भेदक गोलंदाजी. अफगाणिस्तानचा सलामीवीर अब्दुल्ला नादरजन 14 धावांवर बाद झाला, तर फरीदुल्ला एहसान केवळ 13 धावाच करू शकला. तिसऱया क्रमांकावर फलंदाजी करणाऱया सुभान जखैलने 31 धावा केल्या. यष्टिरक्षक नोमान सलारझाई आणि शाह फैसल रहिमी यांनी प्रत्येकी 51 धावा करून अर्धशतके झळकावली. खालच्या फळीत कर्णधार सोहेल खानने नाबाद 36 धावा करून संघाला 227 धावांपर्यंत पोहोचण्यास मदत केली. हिंदुस्थानकडून ईशान सूदने तीन, तर आर्यन सावसानीने दोन विकेट घेतल्या.

Comments are closed.