दुष्काळग्रस्तांसाठी 45 हजार कोटी रुपयांची आवश्यकता आहे; मात्र त्यापैकी 4 हजार कोटी रुपयेही उपलब्ध नाहीत -संजय राऊत

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

महाराष्ट्राचे गुजरातमध्ये रूपांतर करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. देवेंद्र भाऊ फडणवीस यांचे आता ‘देवेन भाई’, सुनेत्राताईंचे ‘सुनेत्रा बेन’ झाले आणि एकनाथ शिंदे यांचे ‘एकनाथ भाई’ झाले आहेत, अशी टीका शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केली आहे. तसेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे दुष्काळासाठी निधी मागायला पाहिजे. दुष्काळग्रस्तांसाठी 45 हजार कोटी रुपयांची आवश्यकता आहे; मात्र त्यापैकी 4 हजार कोटी रुपयेही उपलब्ध नाहीत असेही संजय राऊत म्हणाले.

मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्राचे गुजरातमध्ये रूपांतर करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. देवेंद्र भाऊ फडणवीस यांचे आता ‘देवेन भाई’ झाले आहेत. सुनेत्राताईंचे ‘सुनेत्रा बेन’ झाले आहे आणि एकनाथ शिंदे यांचे ‘एकनाथ भाई’ झाले आहेत. आता मंत्रालयाचेही गुजरात भवन होऊ शकते. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये पूर्वी संपूर्ण देशातील विविध खाद्यपदार्थ मिळत होते. आता तिथे फक्त गुजरातमधील खाद्यपदार्थ मिळतात. ढोकळा, फाफडा, शेवगाठ्या, दाबेली आणि खांडवी असे पदार्थ मिळतात. महाराष्ट्राच्या मंत्रालयातही देवेन भाईंनी याला मान्यता दिली असेल, तर देवेंद्र भाईंनी पुढची निवडणूक गांधीनगरमधून लढवावी. एकनाथ भाईंनी वडोदऱ्यातून आणि सुनेत्रा बेन यांनी एलिस ब्रिजमधून निवडणूक लढवावी, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.

देवेन भाई, एकनाथ भाई आणि सुनेत्रा बेन हे अमित शहा यांना भेटायला जातात. त्यांनी दुष्काळाच्या प्रश्नावर अमित शहा यांची भेट घेतली पाहिजे आणि महाराष्ट्राला अधिक निधी देण्याची मागणी केली पाहिजे. याचा अर्थ महाराष्ट्राच्या तिजोरीत दुष्काळाशी लढण्यासाठी पैसे नाहीत आणि तुम्ही केंद्र सरकारच्या मेहरबानीवर जगत आहात. या लोकांनी महाराष्ट्राची पूर्ण लूट केली आहे. दुष्काळग्रस्तांसाठी 45 हजार कोटी रुपयांची आवश्यकता आहे; मात्र त्यापैकी 4 हजार कोटी रुपयेही उपलब्ध नाहीत, असेही संजय राऊत म्हणाले.

शिरसाट यांच्या घरावर हल्ला का झाला? एका मंत्र्याच्या घरावर हल्ला होतो, ही गंभीर बाब आहे. भले ते आमचे राजकीय विरोधक असतील; पण एखाद्या मंत्र्याच्या घरावर दरोडेखोरांनी हल्ला केला असेल, तर ती गंभीर घटना आहे. मंत्र्याच्या घरात असे काय होते की तिथे दरोडा घालण्याची वेळ आली? दरोडा घालण्यासारखे काहीतरी असेल, तरच दरोडेखोर तिथे जातील ना? मध्यंतरी त्यांच्या घरातून पैशांच्या बॅगेचे चित्रण समोर आले होते. दरोडेखोर उगाचच कुणाच्या घरी जात नाहीत. त्यांना हे माहीत असते की ते घर मंत्र्याचे आहे की आमदाराचे. मात्र, घर मंत्र्याचे असो किंवा आमदाराचे, दरोडा हा दरोडाच असतो, असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.

Comments are closed.