आमची लढाई वृक्षतोडीविरुद्ध; दादागिरी कराल तर…, संजय राऊत यांचा इशारा
कर्जत तालुक्यातील सायडोंगर परिसरात होणाऱ्या टोरंट जलविद्युत ऊर्जा साठवण प्रकल्पाच्या रस्त्यासाठी जमीन मिळावी म्हणून कर्जतमधील सुमारे दीडशेहून अधिक शेतकऱ्यांना भूमी अभिलेख कार्यालयाने भूसंपादनाच्या नोटिसा बजावल्या आहेत. त्यामुळे सुमारे सहाशे एकर वनक्षेत्र बाधित होणार आहे. यावर शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली असून एक झाड तोडून दाखवा, असे आव्हानच दिले आहे.
रविवारी सकाळी माध्यमांनी शेतकऱ्यांना बजावण्यात आलेल्या नोटिसांबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, त्यांनी एक झाड तोडून दाखवावे. आमची लढाई वृक्षतोडीविरुद्ध आहे. कोणत्याही प्रकल्पाला विरोध असण्याचे कारण नाही. आदित्य ठाकरे आणि आम्ही तिथे गेलो तेव्हाही आम्ही हे सांगितले होते. रायगडमध्ये सुपीक जमिनी असून लोकांच्या जमिनी जाता कामा नये. कोणत्याही प्रकारची दादागिरी कराल तर तर याद राखा, असा इशाराही संजय राऊत यांनी दिला.
सायडोंगर परिसरातील जंगलाच्या रक्षणासाठी अख्ख्या महाराष्ट्रातून सगळ्याच राजकीय पक्षाचे लोक उभे राहिलेले. आजही आम्ही लक्ष ठेवून आहोत. मोजणी करा किंवा भाजणी करा, जे तिकडल्या गावकऱ्यांच्या मनात आहे तेच होईल. जबरदस्ती करायचा प्रयत्न कराल तर याद राखा. या कंपनीची सूत्र गुजरातमधून हलत आहेत. गुजरातसाठी तुम्ही महाराष्ट्राची जंगलं तोडाल, इतिहास नष्ट कराल तर आम्ही पक्षभेद विसरून एकत्र येऊ, असेही संजय राऊत म्हणाले.
दूध, भाजीपाला यांचे दर वाढले असून मुंबईत सीएनजीच्या दरातही वाढ झाली आहे. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, मोदी आता यावर मन की बात करतील. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प हरल्यामुळे आणि इस्रायलमध्ये बेंजामिन नेतन्याहू हरल्यामुळे महागाई वाढली आहे, असे मोदी सांगतील, असा टोला संजय राऊत यांनी लगावला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही हल्ला चढवला. लाखो शेतकऱ्यांची दिवाळी मदतीविना गेली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवू नका. भाजप हा एक नंबर खोटारड्या लोकांचा पक्ष आहे, असे संजय राऊत म्हणाले.
Comments are closed.