शक्तिपीठ महामार्ग, पंप स्टोअरेज प्रकल्पांना विरोध; सह्याद्रीच्या रक्षणार्थ पारगड ते रायगड ‘जागरण यात्रा’
सह्याद्रीतील जैवविविधता आणि निसर्ग नष्ट करणाऱया शक्तिपीठ महामार्ग व पंप स्टोअरेज प्रकल्पांच्या विरोधात जनजागृती करण्यासाठी ‘सह्याद्रीच्या रक्षणासाठी पारगड ते रायगड जागरण यात्रा’ काढण्यात येणार आहे. या यात्रेच्या पहिल्या टप्प्यास येत्या 30 नोव्हेंबर रोजी पारगड येथून सुरुवात होणार असल्याची माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे आणि कॉ. संपत देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी कृष्णा भारतीय, अवधूत पाटील आदी उपस्थित होते.
राज्यात भीमाशंकर आणि तारळी आदी 28 ठिकाणी, त्यापाठोपाठ आता कोल्हापूर जिह्यातही पाच पंप स्टोअरेज प्रकल्प उभारले जाणार असून, त्यासाठी दीड ते दोन हजार हेक्टर समृद्ध जंगल उद्ध्वस्त केले जाणार आहे. आजरा, चंदगड आणि दोडामार्गसारख्या अतिसंवेदनशील भागांतून शक्तिपीठ महामार्गाचा घाट घातला जात आहे. आता पंप स्टोअरेज प्रकल्प आणून येथील निसर्ग आणि शेतकऱयांचे हक्काचे पाणी उद्योगांकडे वळवून कायमचा दुष्काळ आणण्याचे धोरण सरकार राबवत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
सह्याद्री हा दक्षिण भारताचा जलस्रोत आणि दुर्मिळ वनस्पती-प्राण्यांचा अधिवास असून, या प्रकल्पांमुळे पर्यावरण, मानवी जीवन आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासही पुसला जाणार असल्याने सह्याद्रीच्या रक्षणार्थ जनजागृतीसाठी या यात्रेचे आयोजन करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
यात्रेच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात सोमवारी (30 रोजी) सकाळी 10 वाजता आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत पारगड (ता. चंदगड) येथून होईल. त्यानंतर हेरेमार्गे चंदगड आणि धामापूर कुरणीसह आजरा येथे सभा व मुक्काम होईल. दुसऱया दिवशी 1 डिसेंबर रोजी पेरणोली, देवकांडगाव, नवले, पाटगाव, कडगाव येथे सभा होऊन गारगोटी येथे सभा पार पडेल. तिसऱया दिवशी 2 डिसेंबर रोजी पन्हाळगड येथे सायंकाळी जाहीर सभेने पहिल्या टप्प्याची सांगता होईल. या यात्रेत राज्यभरातील पर्यावरणप्रेमी, सजग नागरिक आणि युवक-युवतींनी मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Comments are closed.