साताऱ्यात गुटखा, पानमसाल्यासोबत ‘बंटा’ गोळ्या जप्त
साताऱ्यात पोलीस आणि अन्न व औषध विभागाने रविवार पेठेत टाकलेल्या छाप्यामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. मोठय़ा प्रमाणात गुटखा, पानमसाला यासोबत शेकडो ‘बंटा’ गोळ्यांचा साठाही सापडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित साहिल कोळकर याला अटक करण्यात आली असून, त्याला 19 नोव्हेबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. साहिल इमाम कोळकर (रा. रविवार पेठ, सातारा) असे कोठडी सुनावलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
अन्न व औषध विभागाला रविवार पेठेत पानमसाल्याचा साठा असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सातारा शहर पोलिसांच्या सहकार्याने रविवार पेठेत धाड टाकण्यात आली. पोती भरून पानमसाला सापडला असताना त्याच वेळी काही गोळ्या घटनास्थळी होत्या. शेकडो गोळ्या सापडल्यानंतर सर्वांच्या भुवया उंचावल्या. त्याबाबत अधिक माहिती घेतली असता, त्या नशा येणाऱया ‘बंटा’ गोळ्या असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी सर्व मुद्देमाल जप्त केला असून, तो दीड लाख रुपयांचा आहे. संबंधित मुद्देमाल साहिल कोळकर याचा असल्याचे तपासात समोर आल्यानंतर पोलिसांनी त्याला शोधून पकडले. अटक करून त्याला न्यायालयात हजर केले असता, पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, साताऱयात झालेल्या कारवाईनंतर ‘बंटा’ गोळ्या असल्याचे समोर आल्यानंतर पानमसाला, गुटखा व बंटा गोळ्या असे दोन वेगवेळे गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.
पानटपऱ्यांमध्ये सप्लाय
– सातारा शहरासह उपनगरांमध्ये ‘बंटा’ गोळ्यांनी गेल्या तीन ते चार वर्षे धुडगूस घातला आहे. गांजापासून बनवली जाणारी ही छोटी गोळी नशेसाठी वापरतात. अल्पवयीन मुले, तरुण सर्रास याचे सेवन करत आहेत. एखादे गुन्हेगारी कृत्य करण्यासाठी ‘किक’ म्हणूनदेखील बंटा गोळी खाणाऱयांची संख्या मोठी आहे. साताऱयात छाप्यामध्ये मोठय़ा प्रमाणात बंटा गोळ्या सापडण्याची ही पहिली कारवाई आहे. संबंधित गोळी तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवली जाणार आहे.
Comments are closed.