सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे महेंद्र लाड, उपाध्यक्षपदी तानाजी पाटील बिनविरोध
सागंली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे ज्येष्ठ संचालक महेंद्र लाड यांची, तर उपाध्यक्षपदी शिंदे गटाचे तानाजी पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. 1997नंतर तब्बल 29 वर्षांनी जिल्हा बॅँकेत महेंद्र लाड यांच्या रूपाने काँग्रेसला अध्यक्षपद मिळाले आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी निवडीनंतर जिल्हा बँकेतही महायुतीत फूट पडल्याचे स्पष्ट झाले.
निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीसाठी आज नूतन संचालक मंडळाची बैठक आयोजित केली होती. अध्यक्षपदासाठी काँग्रेसचे महेंद्र लाड यांचा, तर उपाध्यक्षपदासाठी शिंदे गटाचे तानाजी पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एक अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी सुनील चव्हाण यांनी अध्यक्षपदी महेंद्र लाड व उपाध्यक्षपदी तानाजी पाटील यांची बिनविरोध निवड जाहीर केली. अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी भाजप व महायुतीने एकही अर्ज न भरता महाविकास आघाडीला बाय दिला.
बॅँकेचे नूतन अध्यक्ष महेंद्र लाड व उपाध्यक्ष तानाजी पाटील यांचा खासदार विशाल पाटील, बॅँकेचे मावळते अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांच्यासह बॅँकेचे संचालक आमदार डॉ. विश्वजीत कदम, माजी खासदार संजयकाका पाटील, माजी मंत्री अजितराव घोरपडे, आमदार गोपीचंद पडळकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील, वैभव शिंदे, संभाजी कचरे, विराज नाईक, सतीश देशमुख, के. डी. कांबळे, पृथ्वीराज पाटील, राहुल महाडिक, रणधीर नाईक, संचालिका पूजा पाटील, वर्षा सावंत, नितीन होनराव, अण्णासाहेब कोरे यांनी सत्कार केला. यावेळी जीतेश कदम, माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्हा बँकेत ‘झेडपी’चा फॉर्म्युला
– सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीत काँग्रेसचे सर्वाधिक सहा संचालक आहेत. त्यानंतर भाजपचे पाच, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे चार, शिंदे गटाचे तीन व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तीन संचालक आहेत. वास्तविक महायुती एकत्र राहिली असती तर भाजप, राष्ट्रवादी व शिंदे गटाचे संख्याबळ 11 होते. त्यांची सत्ता आली असती. मात्र, महायुतीत फूट पडली. शिंदे गटाचे तीन, अजित पवार गटाचे दोन संचालक फुटले. त्यामुळे महाविकास आघाडीचे संख्याबळ वाढले.
Comments are closed.