छत्रपतींचा सह्याद्री फडणवीस गुजरातच्या कंपनीला विकताहेत, आदित्य ठाकरे यांची टीका, दुसऱ्यांदा पोहचले कर्जतच्या साय डोंगरावर
सह्याद्री हा केवळ डोंगर नाही तर तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे. मात्र हाच सह्याद्री गुजरातमधील कंपनीला विकण्याचे काम फडणवीस करत आहेत, असा घणाघात शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला. झाडे तोडण्याचे काम थांबले असले तरी टोरंट प्रकल्पाचे काम सुरूच आहे. जोपर्यंत या प्रकल्पाचे काम थांबवले जात नाही तोपर्यंत लढा सुरूच राहील, असे आदित्य ठाकरेंनी ठणकावले.
टोरंट पॉवर ही गुजरातची कंपनी कर्जत भीमाशंकरच्या साय डोंगर परिसरात वीज प्रकल्प उभारत आहे. या कंपनीसाठी साय डोंगरावरील लाखो झाडांची कत्तल होणार असून हजारो झाडे आधीच कापण्यात आली आहेत. शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी शिवसैनिकांसह 20 ऑक्टोबर रोजी या जंगलात धडक देत झाड तोडणीचे काम बंद पाडले होते. त्यानंतर महाराष्ट्रातील विविध पक्ष, संघटना, पर्यावरण प्रेमी नागरिक, शेतकरी, स्थानिक नागरिक, महाविद्यालयीन तरुण या प्रकल्पाविरोधात एकवटले आणि मोठे जनआंदोलन उभे राहिले. आज पुन्हा एकदा आदित्य ठाकरे यांनी जंगलाला भेट देऊन पाहणी केली तसेच स्थानिक ग्रामस्थ व शेतकऱयांशी चर्चा केली.
शिवसेना उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत, तालुकाप्रमुख बाजीराव दळवी, सचिव रामदास घरत, युवासेना विधानसभा अधिकारी अॅड. संपत हडप, युवा तालुका अधिकारी प्रथमेश मोरे, विधानसभा चिटणीस कल्पेश खडे, उपतालुका युवा अधिकारी अक्षय चव्हाण, तालुका चिटणीस पंकज म्हसे, जगदीश ठाकरे यांच्यासह पदाधिकारी, शिवसैनिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सरकारने सीसी टीव्ही लावले असले तरी जंगलावर आमचे लक्ष आहे
याआधी वृक्षतोड करण्यात आलेल्या परिसरात वनविभागाने सीसीटीव्ही बसवले आहेत याकडे लक्ष वेधले असता आदित्य ठाकरे म्हणाले, सरकारने सीसी टीव्ही लावले असले तरी आमचे या जंगलावर बारीक लक्ष आहे. जंगलाचे संरक्षण करण्यासाठीच आम्ही इथे आलो आहोत. कॅमेरे लावून आमच्याकडे लक्ष देण्यापेक्षा निसर्गाचे आणि जंगलाचे संरक्षण करण्यासाठी पुढाकार घ्या आणि आम्ही या जंगलाचे संरक्षण कसे करतो ते कॅमेऱ्यातून पहा असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला.
26 नोव्हेंबरची जागा मोजणी हाणून पाडा
26 नोव्हेंबरला टोरंट प्रकल्पाच्या जागेसाठी मोजणी करण्याचा घाट सरकारने घातला आहे. ही मोजणी हाणून पाडण्यासाठी आणि महाराष्ट्राची ताकद दाखवून देण्यासाठी सर्व शिवसैनिक, शेतकरी, पर्यावरण प्रेमी आणि नागरिकांनो, कर्जतच्या साय डोंगरावर या, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले.
Comments are closed.