कर्ज फेडण्यासाठी आधी किडनी विकली, आता हक्काच्या शेतीसाठी संघर्ष; जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागायला निघालेल्या शेतकऱ्याला पोलिसांनी घेतले ताब्यात
सावकारी कर्ज फेडण्यासाठी स्वतःची किडनी विकण्याची वेळ आलेल्या शेतकरी रोशन कुळे यांचा संघर्ष अद्यापही संपलेला नाही. सावकारांच्या ताब्यात असलेली जमीन परत मिळवून देण्याचे आदेश प्रशासनाने काढले असले, तरी प्रत्यक्षात मात्र त्यांना अद्याप शेतीचा ताबा मिळालेला नाही. विशेष म्हणजे, सातबारा उतारा रोशन कुळे यांच्या वडिलांच्या नावावर असतानाही कुटुंबाला आपल्या हक्काच्या शेतीपासून वंचित राहावे लागत असल्याचा आरोप आहे. दरम्यान, कुटुंबीयांनी शेतीचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला असता सावकारांच्या गुंडांकडून शेतातून धमकावून परत पाठविल्याचे गंभीर आरोप रोशन कुळे यांनी केला आहे.
या प्रकरणी दाद मागण्यासाठी रोशन कुळे जिल्हाधिकारी कार्यालयात जाण्यास निघाले असताना, त्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना घरातून ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे एका बाजूला प्रशासनाचा जमीन परत देण्याचा आदेश आणि दुसऱ्या बाजूला प्रत्यक्ष ताब्यासाठी शेतकऱ्याची सुरू असलेली धडपड, यामुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. अखेर रोशन कुळे यांना न्याय कधी मिळणार आणि त्यांच्या कुटुंबाला हक्काची जमीन परत मिळणार का, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
Comments are closed.