चौपदारीकरणातील चिपळूण उड्डाणपुलावरुन ३० नोव्हेंबरपर्यंत वाहतूक सुरु होणार; डांबरीकरण, रंगरंगोटी व वीज केबलचे काम अंतिम टप्प्यात
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चिपळूण शहरातील उड्डाणपुलाचे काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले असून, बहुचर्चित उड्डाणपुलावरून हलकी वाहतूक सुरू करण्याचे स्वप्न येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत प्रत्यक्ष पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी २८ नोव्हेंबरपासून कार व हलकी वाहने सोडून पुलाची चाचणी घेण्यात येणार आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या या कामातून लवकरच चिपळूणकरांची सुटका होणार आहे.
उड्डाणपुलाची एक लेन गणेशोत्सवाच्या काळात वाहतुकीसाठी खुली करण्याचा प्रशासनाचा विचार होता. मात्र, प्रत्यक्ष कामाची स्थिती पाहाता हा पर्याय व्यवहार्य नसल्याचे स्पष्ट झाले उड्डाणपुलावरील भरावाचे मोठे काम बाकी असल्याने सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पवार यांनी त्यावेळी विरोध केला होता. हा पूल सुरु केल्यास अनर्थ होईल असा आवाज उठविल्यावर प्रशासनाने पर्यायी मार्ग असलेल्या सर्व्हिस रोडच्या दुरुस्तीवर लक्ष केंद्रित केले होते.
उड्डाणपुलाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंकडील भरावाचे काम दिवस-रात्र सुरु असून चार-पाच दिवसात ते पूर्ण होईल. त्यानुतर पुढील डांबरीकरणाची प्रक्रिया पूर्ण होईल. एक्सपेशन जॉईटवर मस्टिक जॉईंटवर अत्याधुनिक पद्धतीने डांबरीकरण होईल. त्यादृष्टीने हालचाली सुरु आहेत. पुलाच्या वरील दोन्ही आजूचे डंबरीकरण पूर्ण झाले आहे. डाबरीकरण पूर्ण झाल्यावर वाहतुकीला हिरवा कंदील दाखविला जाणार आहे.
उड्डाणपुलासाठी वाशिष्ठीनदी पूल, बहादूरशेख नाका ते प्रांत ऑफिस पर्यंत ९६ काँक्रिटचे मजबूत पिलर उभारण्यात आले आहेत. या पिलरवर ७२६ गर्डर चढविण्यात आले असून तर १७१ स्लॅबंचे काम पूर्ण झाले आहे. हा पूल आता तांत्रिकदृष्ट्या पूर्ण झाला असून डांबरीकरण करून बाजूला विजेचे खांब उभारण्यात आले आहेत. लवकरच भरावाचे काम पूर्ण झाल्यावर अंतिमीकरण होऊन वाहतुकीसाठी सज्ज असेल.
उड्डाणपुलावर विजेच खांब बसविण्यात आले असून त्याला केबल व जोडण्याचे काम सुरु आहे. केबलचे काम पूर्ण झाल्यावर दिवे लावून ते प्रज्वलित केले जातील. वरती पुलावर खालील सर्व्हिस रोडसाठीही दिवे बसविले जाणार आहेत. उड्डाणपुलाच्या मुख्य
भागावर एकूण १०८ दिवे बसविण्यात येणार आहेत. पुलाच्या संपूर्ण मार्गावर एकूण १४६ दिव्यांची प्रकाशयोजना राहाणार आहे. तर पुलाच्याबाजुच्या काँक्रिटच्या भिंतींची रंगरंगोटी सुरु करण्यात येणार आहे. साधारणतः २८ नोव्हेंबर पर्यंत ही सर्वकामे पूर्ण होतील व हा पूल वाहतुकीसाठी सज्ज होईल असे इझाल इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून समजते.
येत्या आठवडाभरात काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. ही कामे पूर्ण झाल्यानंतर पुलावरून वाहतूक सुरू करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. इझाल इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. या कंपनीने उड्डाणपुलाचे काम पूर्ण केले असून, पुढील दहा वर्षे या पुलाची देखभाल व दूरुस्तीची जबाबदारीही याच कंपनीकडे राहाणार आहे.
Comments are closed.