स्टॅलिनचा पराभव करणाऱ्या TVK आमदाराचे निधन

वृत्तसंस्था/चेन्नई

तामिळनाडूतील सत्ताधारी टीव्हीके पक्षाचे आमदार व्ही. एस. बाबू यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांनी एप्रिल 2026 मध्ये झालेल्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत डीएमके प्रमुख एम. के. स्टॅलिन यांचा पराभव केला होता. कोलाथूरचे 75 वर्षीय आमदार बाबू यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे एमजीएम हेल्थकेअरमध्ये दाखल करण्यात आले होते. ते दीर्घकाळापासून श्वसनाच्या आजाराने त्रस्त असल्यामुळे अतिदक्षता विभागात उपचार घेत होते. उपचारादरम्यानच  गुरुवारी दुपारी 2:24 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री विजय यांनी शोकभावना व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

व्ही. एस. बाबू यांच्या निधनाबाबत रुग्णालयाचे वैद्यकीय सेवा संचालक राजेश अग्रवाल यांनी एक अधिकृत बुलेटीन जारी केले. सर्व वैद्यकीय सुविधा देऊनही व्ही. एस. बाबू यांची प्रकृती खालावत गेली आणि सर्व उपचार अयशस्वी ठरले. उपचार सुरू असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि गुरुवारी दुपारी त्यांचे निधन झाल्याचे वैद्यकीय बुलेटीनमध्ये नमूद करण्यात आले आहे.

2026 च्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत राज्यात एक मोठी राजकीय उलथापालथ झाली होती. कोलाथूर विधानसभा मतदारसंघात टीव्हीकेचे उमेदवार व्ही. एस. बाबू यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचा 7,731 मतांच्या फरकाने पराभव केला होता. या पराभवामुळे डीएमके अध्यक्ष एम. के. स्टॅलिन हे माजी मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्यानंतर विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करणारे राज्याच्या इतिहासातील दुसरे मुख्यमंत्री ठरले. व्ही. एस. बाबू हे पूर्वी डीएमकेचे पदाधिकारी होते, परंतु निवडणुकीपूर्वी त्यांनी टीव्हीकेमध्ये प्रवेश केला होता.

Comments are closed.