वसई-पालघर अंतर २५ किमीने होणार कमी, नारिंगी खाडीवरील सहा पदरी पुलाचा मार्ग मोकळा
वसई-विरार आणि पालघरला जोडणाऱ्या नारिंगी पुलाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या पुलासाठी गेल्या अनेक वर्षांपासून पालिकेचा पाठपुरावा सुरू होता. अखेर या प्रकल्पाला एमएमआरडीएने तत्त्वतः मंजुरी दिली असून लवकरच निविदा काढून कामाला सुरुवात केली जाणार आहे. पुढील पाच वर्षांत नारिंगी पुलाचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याने वसई-पालघरचे अंतर २५ किमीने कमी होणार आहे.
वसई-विरार येथून पालघरच्या दिशेने जाण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ हा प्रमुख मार्ग आहे. या मार्गाने प्रवास करताना साधारण दोन तासांचा कालावधी लागतो. मात्र नारिंगी खाडीवरील प्रस्तावित पूल कार्यान्वित झाल्यानंतर प्रवासाचे अंतर सुमारे २५ किलोमीटरने कमी होणार असून प्रवासाच्या वेळेत अंदाजे एक तासाची बचत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह व्यावसायिक, उद्योजक आणि औद्योगिक क्षेत्रालाही या प्रकल्पाचा मोठा फायदा होणार आहे.
वाहतुकीवरील ताण कमी होणार
वाढते शहरीकरण, औद्योगिक विस्तार आणि भविष्यातील वाहतुकीची गरज लक्षात घेता नारिंगी खाडीवरील हा पूल वसई-विरार आणि पालघर जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा देणारा ठरण्याची अपेक्षा आहे. या प्रकल्पामुळे सध्याच्या वाहतूक व्यवस्थेवरील ताण कमी होण्याबरोबरच परिसरातील दळणवळण, व्यापार आणि आर्थिक व्यवहारांनाही चालना मिळणार आहे. महापालिकेबरोबरच माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी या प्रकल्पांसाठी शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा केला होता. नारिंगी खाडी पुलाला मिळालेली मंजुरी हा या प्रयत्नांमधील महत्त्वाचा टप्पा असल्याचे महापौर अजीव पाटील यांनी सांगितले.
वेळ आणि इंधनाची बचत
नारिंगी पुलामुळे वसई ते पालघरमधील अंतर २५ किमीने कमी होणार आहे. त्यामुळे वेळ आणि इंधनाची बचत होणार आहे. त्याशिवाय राष्ट्रीय महामार्ग ४८ वरील वाहतूककोंडीची कटकटदेखील कमी होणार आहे. खाडीपुलामुळे विरार परिसरातील अर्नाळा, आगाशी आणि बोळींज ही महत्त्वाची गावे थेट या मार्गाशी जोडली जाणार आहेत. हा प्रकल्प एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
– विशेष म्हणजे, हा पूल केवळ वसई-विरार आणि पालघर या दोन भागांना जोडणारा पर्यायी मार्ग ठरणार नसून भविष्यात पालघर जिल्ह्यात प्रस्तावित असलेले विमानतळ तसेच जिल्ह्यातील विकासाच्या दृष्टीनेही महत्त्वापूर्ण ठरू शकतो.
– भविष्यातील वाढती वाहतूक लक्षात घेऊन हा पूल सहा पदरी करण्यात येणार आहे. तसेच पुलाला जोडणाऱ्या सध्याच्या अरुंद रस्त्यांचे रुंदीकरण आणि आवश्यक पायाभूत सुविधांच्या विकासकामांचाही या प्रकल्पात समावेश प्रस्तावित आहे.
Comments are closed.