धावती एक्स्प्रेस पकडण्याच्या नादात प्रवाशाचा हात खांद्यापासून तुटला, कल्याण रेल्वे स्थानकातील भीषण दुर्घटना

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

धावती एक्स्प्रेस गाडी पकडण्याच्या प्रयत्नात एका ४३ वर्षीय प्रवाशाला आपला हात गमवावा लागल्याची दुर्घटना कल्याण रेल्वे स्थानकात बुधवारी सायंकाळी घडली. दौंड-इंदूर एक्स्प्रेस ही फलाटावरून निघाल्यानंतर या प्रवाशाने ती पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत गाडीने वेग पकडला होता. ही धावती गाडी पकडण्याच्या नादात हा प्रवासी निसटला आणि त्याचा उजवा हात खांद्यापासून तुटला. त्याच्या उजव्या डोळ्याजवळही गंभीर दुखापत झाली. जखमी झालेल्या या प्रवासाला रेल्वे पोलिसांनी तातडीने रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्यामुळे या प्रवासाला सायन रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

दौंड जंक्शन येथून इंदूरच्या दिशेने निघालेली दौंड-इंदूर एक्स्प्रेस ही बुधवारी सायंकाळी ६.४५ च्या सुमारास कल्याण रेल्वे स्थानकात आली. ही गाडी ६.५५ च्या सुमारास पुढील प्रवासासाठी इंदूरच्या दिशेने फलाट क्रमांक ७ वरून निघाली. गाडीने हळूहळू वेग पकडण्यास सुरुवात केली असता रवी बामणे (४३) हे प्रवासी फलाटावर आले. त्यांनी ही धावती गाडी पकडण्याचा प्रयत्न केला. बामणे हे गाडी पकडण्याचा प्रयत्न करत असताना गाडीने वेग पकडला होता. त्यानंतरही बामणे यांनी गाडी पकडण्याचा केलेला प्रयत्न त्यांच्या अंगलट आला. गाडी पकडताना घसरून पडल्यामुळे त्यांचा उजवा हात खांद्यापासून तुटून पडला. ते गंभीर जखमी होऊन या तुटलेल्या हातासह फलाटावर कोसळले. त्यानंतर रेल्वे पोलीस आणि बचाव पथकाने बामणे यांना तातडीने रुग्णालयात हलवले.

रवी बामणे हे इंदूरमधील रहिवासी आहेत. कल्याण रेल्वे स्थानकात झालेल्या अपघातात त्यांचा हात तुटल्यानंतर रेल्वे पोलिसांनी त्यांना तातडीने नजीकच्या रुक्मिणी रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने मुंबई येथील सायन रुग्णालयात हलवण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले आहे.

जीव धोक्यात घालू नका

धावती लोकल किंवा एक्स्प्रेस पकडणे हे धोकादायक आहे. ते आपल्या जीवावर बेतू शकते, असा सूचना प्रत्येक रेल्वे स्थानकात दिवसभर सुरू असतात. मात्र तरीही काही प्रवासी या सूचनांकडे दुर्लक्ष करून आपला जीव धोक्यात घालतात. तीन प्रवाशांनी अशा पद्धतीने आपला जीव धोक्यात घालू नये. धावती लोकल किंवा एक्स्प्रेस पकडणे टाळावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Comments are closed.