जालना जिल्ह्याच्या बागायती ऐश्वर्याला दुष्काळाची नजर…पाण्याअभावी मोसंबीच्या बागा होरपळल्या! पुढील पावसापर्यंत बागा जगविण्याचे मोठे आव्हान
>> संजय कोथोडे
जालना जिल्ह्याचे बागायती ऐश्वर्य असलेल्या मोसंबीच्या बागांना दुष्काळाची नजर लागली आहे! पाण्याअभावी मोसंबीच्या बागा होरपळल्या असून, पुढील पावसापर्यंत बागा जगवण्याचे मोठे आव्हान शेतकऱ्यांसमोर उभे राहिले आहे. एकीकडे मोसंबीला जीआय मानांकन मिळून दहा वर्षे उलटली, तर दुसरीकडे या पिकाला आजवर ना अपेक्षित राजाश्रय मिळाला, ना बाजारभावात स्थिरता. त्यातच आता एल् निनोच्या प्रभावामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीने मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.
गोदावरी, दुधना, पूर्णा, कुंडलिका, खेळणा नद्यांनी जालना जिल्हयाचे प्राक्तनच बदलले. नदीकाठाने बहरलेल्या मोसंबीच्या बागा हे जिल्हयाचे बागायती ऐश्वर्य! उसाच्या बरोबरीने शेतकऱ्यांनी मोसंबीच्या फळबागांचे विश्व निर्माण केले. निसर्गाचा लहरीपणा सोसत शेतकऱ्यांनी या बागा जिवापाड जपल्या. पण यंदाच्या दुष्काळाने शिवाराच्या नरडीलाच नख लावले. जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या निम्माही पाऊस पडला नाही. विहिरी, शेततळे कोरडेठाक पडल्यानंतर शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले. आता पुढचा पावसाळा येईपर्यंत या बागा कशा जगवायच्या या चिंतेने शेतकरी हैराण आहे.
जालन्याच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार
जालना तालुक्यात ३०१२.२ हेक्टर, बदनापूर ८६०१ हेक्टर, जाफराबाद ८४.७ हेक्टर, भोकरदन ११०.२ हेक्टर, अंबड ९५३४.२ हेक्टर, मंठा १६२.२ हेक्टर, परतूर ४३६.५ हेक्टर आणि घनसावंगी तालुक्यात ७६०४.९७ हेक्टरवर मोसंबीच्या बागा उभ्या आहेत. सर्वाधिक मोसंबीचे उत्पादन अंबड तालुक्यात घेतले जाते. त्यानंतर घनसावंगी तालुक्याचा नंबर लागतो. जिल्ह्यात तब्बल २९ हजार ५४५ हेक्टर क्षेत्रावर मोसंबीच्या बागा उभ्या आहेत. या बागांमधून साधारण साडेतीन लाख मेट्रिक टन मोसंबीचे उत्पादन घेण्यात येते. हजारो शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या या फळपिकाने जिल्ह्याच्या कृषी अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लावला आहे. मात्र दुष्काळाने मोसंबीच्या बागांची परवड केली असून, त्याचा सर्वात मोठा परिणाम जिल्ह्याच्या अर्थकारणावर होणार आहे.
वर्षानुवर्षे जोपासलेल्या बागा गमावण्याची भीती
मोसंबी हे दीर्घकालीन मेहनत आणि मोठ्या भांडवली गुंतवणुकीचे फळपीक आहे. एकदा बाग उभी राहिल्यानंतर तिचे संगोपन करण्यासाठी वर्षभर नियमित पाणी, खते आणि औषधांची आवश्यकता असते. मात्र, यंदा पावसाने ओढ दिल्याने विहिरी, बोअरवेल आणि अन्य जलस्रोतांमधील पाणीसाठा आटत चालला आहे. ठिबक सिंचनाची व्यवस्था असूनही पाणीच उपलब्ध नसेल, तर बागांना वाचवायचे कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी झाडांची पाने सुकत आहेत, फांद्या वाळत आहेत, तर काही बागा पूर्णपणे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. ही केवळ एका हंगामातील उत्पादन घटण्याची समस्या नसून, वर्षानुवर्षे जोपासलेल्या बागा कायमच्या गमावण्याची भीती आहे.
जीआय मानांकन मिळूनही मोसंबी उपेक्षितच!
विशेष म्हणजे, जालना मोसंबीला भौगोलिक मानांकन जीआय टॅग मिळाल्याने या फळपिकाला राष्ट्रीय स्तरावर वेगळी ओळख मिळाली. मात्र, या मानांकनाचा लाभ प्रत्यक्ष उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत कितपत पोहोचला, हा प्रश्न आजही कायम आहे. मोसंबीला कधीही अपेक्षित राजाश्रय मिळाला नाही. बाजारपेठेत दराची शाश्वती नसल्याने शेतकऱ्यांना अनेकदा उत्पादन खर्चही वसूल करता आला नाही. आता दुष्काळाने बागाच हिरावून घेण्याची वेळ आणली आहे. मोसंबीच्या नावाने जिल्ह्याची ओळख, पण मोसंबी उत्पादक मात्र संकटात! ही आजची वस्तुस्थिती आहे.
Comments are closed.