कल्याण-डोंबिवलीतील गरजू रुग्णांची फरफट; 54 ‘आपला दवाखान्यां’ना टाळे; 270 कर्मचाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड, ठेकेदाराचे एक हजार कोटी राज्य सरकारने थकवले

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

फक्त एक रुपयात गोरगरीब रुग्णांना सेवा मिळावी यासाठी राज्य सरकारने कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात ‘आपला दवाखाना’ सुरू केला. मात्र ठेकेदार कंपनीचे १ हजार ६७ कोटी रुपयांची बिले थकवल्याने ५४ आपला दवाखान्यांना टाळे ठोकण्यात आले आहे. त्यामुळे २७० कर्मचाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. तसेच गरीबांचे दवाखाने बंद झाल्याने रुग्णांचे हाल होत असून त्यांना खासगी रुग्णालयात जावे लागत आहे. दरम्यान ठेकेदाराची बिले देऊन लवकरात लवकर हे दवाखाने पुन्हा सुरू करावेत, अशी मागणी कल्याण-डोंबिवलीवासीयांनी केली आहे.

आपला दवाखाना या क्लिनिकचे २०२३मध्ये वाजत गाजत उद्घाटन करण्यात आले. या क्लिनिकमध्ये उपचार घेणारे रुग्ण अतिशय गरीब असल्याने तेथील सुविधांकडे सरकारचे सुरुवातीपासूनच दुर्लक्ष होत आहे. मागील काही महिन्यांपासून हे क्लिनिक चालविण्यासाठी सरकारने ठरवून दिलेला मोबदला थकला आहे. वारंवार पाठपुरावा करूनही सरकारने थकलेला मोबदला दिलेला नसल्यानेच आता नोव्हेंबरपासून क्लिनिक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. या क्लिनिक बंदमुळे रुग्णांची हेळसांड सुरू आहे.

  • आपला दवाखान्यांत १०६ प्रकारची औषधे देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. प्रत्यक्षात १० ते १५ प्रकारची औषधेच या क्लिनिकमधून उपलब्ध करून दिली जात असल्याचा आरोप रुग्णांनी केला आहे.
  • क्लिनिक सुरू झाल्यापासून आतापर्यंत येथे खोकल्याचे औषध, अॅसिडिटीवरील औषधे, टीटीसारखी इंजेक्शन्स, उलटी-जुलाबावरील औषधे मिळत नसल्याची रुग्णांची तक्रार आहे.

सरकारची अनास्था

‘आपला दवाखाना’ चालविणाऱ्या एचएलएल लाईफकेअर कंपनीची राज्य सरकारकडे सुमारे १,०६७ कोटी रुपयांची देयके थकीत असल्याने कंपनीने दवाखाने बंद केल्याची माहिती काँगेसच्या गटनेत्या कांचन कुलकर्णी यांनी दिली. सरकारच्या आर्थिक अनास्थेमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यसेवेवर गदा आली असून एकीकडे रुग्णांची गैरसोय होत असताना दुसरीकडे कर्मचाऱ्यांनाही रोजगार गमावावा लागला आहे.

Comments are closed.