पुण्यात दोन महिने बुलडोझर मोहीम; हस्तक्षेप करणाऱ्यांचे नाव फोटोसह जाहीर करण्याचा आयुक्तांचा इशारा
रस्त्यांवरील पथारी व्यावसायिकांवर कारवाई करून अतिक्रमणाचा प्रश्न सुटणार नाही. कारण अतिक्रमणांचे खरे मूळ रस्त्यांलगतच्या इमारतींच्या फ्रंट मार्जिन, साइड मार्जिन आणि पार्किंगच्या जागांमध्ये आहे. त्यामुळे आता फुटपाथपुरती कारवाई न करता, अतिक्रमणांच्या मुळावरच घाव घालण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांवरील अशा जागांमध्ये थाटलेले सुमारे अडीच लाख अनधिकृत व्यवसाय हटवण्यासाठी पुढील दोन महिने सलग मोहीम राबवण्यात येणार आहे. या कारवाईत राजकीय हस्तक्षेप करणाऱ्यांचे नाव आणि छायाचित्र सार्वजनिक करण्याचा इशारा महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिला.
महापालिकेच्या मुख्य सभेत दोन दिवसांपूर्वी फर्ग्युसन रस्त्यावरील अतिक्रमणांवरून सत्ताधारी भाजपच्याच नगरसेवकांनी आंदोलन करत प्रशासनाला धारेवर धरले होते. अगदी प्रशासनावर हप्तेखोरीचे आरोप केले होते. त्यानंतर आयुक्तांनी स्वतः मैदानात उतरून कारवाईचा धडाका सुरू केला आहे. फर्ग्युसन रस्त्यापाठोपाठ जंगली महाराज रस्ता, कोथरूड आणि शिवाजी पुण्यात दोन महिने बुलडोझर मोहीम रस्त्यावरही अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली. या पाश्र्वभूमीवर पत्रकार परिषदेत त्यांनी आगामी मोहिमेची दिशा स्पष्ट केली.
नवल किशोर राम म्हणाले, ‘शहरातील अतिक्रमणे हे प्रशासनाचे अपयश आहे, हे मान्य आहे. मात्र, आता मागील गोष्टी उगाळण्यापेक्षा ठोस कृती करण्यावर भर आहे. शहरात केवळ २२ हजार परवानाधारक पथारी व्यावसायिक असताना अडीच ते तीन लाख अनधिकृत व्यावसायिक फ्रंट आणि साईड मार्जिनमध्ये व्यवसाय करीत असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या जागा मोकळ्या झाल्यास वाहतूककोंडी कमी होण्यासह पादचाऱ्यांनाही सुरक्षितपणे चालता येईल. अग्निशमन दलाच्या वाहनांच्या हालचालींसाठीही या जागा मोकळ्या असणे आवश्यक आहे. अनधिकृत ओटे, रेलिंग, बॅरिकेड्स, कॅनोपी आणि अन्य बांधकामे हटविण्यात येणार आहेत. संबंधित व्यावसायिकांनी स्वतःहून अतिक्रमणे काढून घ्यावीत, अन्यथा आस्थापना सील करण्यासह फौजदारी कारवाईही केली जाईल. पुन्हा अतिक्रमण झाल्यास संबंधितांवर बांधकाम विभागामार्फत कठोर कारवाई होईल. मोहिमेसाठी अतिरिक्त जेसीबी, बुलडोझर आणि यंत्रसामग्रीसह १०० एमएसएफ जवानांची नियुक्ती करण्यात येणार आहे. सुट्टीच्या दिवशीही कारवाई थांबणार नाही.’
दबाव आणणाऱ्यांची गय नाही !
‘अतिक्रमण हटविताना कोणत्याही स्तरावरून दबाव आणला गेल्यास तो सहन केला जाणार नाही. चुकीचे काम करण्यासाठी कोणी सूचना दिल्यास अधिकाऱ्यांनी ती मान्य करू नये. हस्तक्षेप करणाऱ्यांची नावे जाहीर करण्याचे निर्देश क्षेत्रीय आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत. कारवाई कोण गरीब किंवा श्रीमंत याचा विचार करून होणार नाही. अतिक्रमण असेल तर ते हटविलेच जाईल,’ असा ठाम निर्धार आयुक्तांनी व्यक्त केला.
अतिक्रमणांच्या प्रश्नावर आयुक्तांना गांधीजींची आठवण !
‘पुण्यातील अतिक्रमणांवर यापूर्वी कारवाई का केली नाही, असे कोणी विचारले तर यावर माझ्याकडे उत्तर नाही,’ अशी स्पष्ट कबुली आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली. त्यानंतर त्यांनी महात्मा गांधीजींच्या विचारांची आठवण करून दिली. गांधीजी म्हणायचे, ‘आपण दररोज काहीतरी नवे शिकतो. मलाही पुण्यातील फ्रंट मार्जिनवरील अतिक्रमणांची समस्या ही सर्वांत मोठी असल्याचे आता समजले, असे ते म्हणाले. त्यामुळे अतिक्रमणांचा प्रश्न इतकी वर्षे कायम असताना प्रशासनाला त्याचे गांभीर्य आता कळले का,’ असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शहरातील अतिक्रमणे हे प्रशासनाचे अपयश आहे. नागरिकांना चांगले आणि सुरक्षित जीवन जगता यावे, यासाठी काही कठोर निर्णय घेण्याची गरज आहे. शहरासाठी अतिक्रमण हा मोठा आजार असून, कारवाईत कोणाचीही गय केली जाणार नाही. फर्ग्युसन रस्त्यावरील अतिक्रमणांच्या प्रश्नामुळे हे समोर आले आहे. डिसेंबरअखेरपर्यंत शहरातील सर्व अतिक्रमणे काढली जातील. त्यानंतरदेखील कारवाईत सातत्य राहील.
नवल किशोर राम, महापालिका आयुक्त
Comments are closed.