शेतकऱ्यांचा ५० गुंठे भूखंड व्यापाऱ्यांच्या घशात घातल्याचा आरोप, कल्याण बाजार समितीत प्रशासकांचा बेकायदा कारभार
कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतकऱ्यांसाठी राखीव असलेला ५० गुंठे भूखंड ठाणे जिल्हा उपनिबंधक डॉ. किशोर मांडे यांनी एका व्यापारी संस्थेच्या घशात घातल्याचा आरोप मार्केट कमिटीमधील फळ व भाजीपाला व्यापारी संघटनेचे अध्यक्ष गणेश पोखरकर यांनी केला आहे. शेतकऱ्यांचा भूखंड कोणत्याही संघटनेला देऊ नये, अशी मागणीही त्यांनी एपीएमसीसह पणन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे केली आहे.
कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचा पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम २१ मे २०२५मध्ये जाहीर झाला होता. २९ जून २०२५ रोजी संचालकांची निवडणूक होऊन नवीन संचालक मंडळ बाजार समितीत निवडून आले होते. याच वेळी ३० जून २०२५ रोजी प्रशासक ठाणे जिल्हा उपनिबंधक डॉ. किशोर मांडे यांनी बाजार समितीचा सर्व्हे नंबर २८२ व २८४ मधील ५० गुंठे भूखंड लक्ष्मी मार्केट व्यापारी संघटनेस देण्याचा निर्णय घेतला. या आदेशाची अंमलबजावणी करण्याबाबत पणन संचालक यांना आदेशही दिले. मात्र हा भूखंड शेतकऱ्यांसाठी राखीव असल्यामुळे मांडे यांनी परस्पर घेतलेला निर्णय आता चौकशीच्या फेऱ्यात अडकला आहे.
हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी
२००९मध्ये लक्ष्मी मार्केट व्यापारी संघटनेला व्यापारासाठी बाजार समितीने व्यापारी गाळे बांधून दिले होते. २०१२मध्ये संघटनेने ए बिल्डिंगमध्ये ३२४ गाळे व्यापारासाठी दिले. असे असतानाही प्रशासक मांडे यांनी कल्याण बाजार समितीवर नवीन संचालक मंडळ निवडून आले असताना फक्त सभापती, उपसभापती निवडणूक झाली नसल्याने मिळालेल्या कालावधीत भूखंडाचे श्रीखंड वाटप करत बाजार समितीची मोठी आर्थिक हानी केली. मांडे यांनी केलेल्या गैरकारभाराच्या चौकशीसाठी हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी सादर करणार असल्याचा इशारा आमदार किसान कथोरे यांनी दिला आहे.
बाजार समितीच्या आवारात पर्यायी मार्केट सुरू होणे ही बाब गंभीर आहे. यामध्ये शेतकरी आणि व्यापारी यांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे लक्ष्मी मार्केट व्यापारी संघटनेला भूखंड देण्यास तीव्र विरोध राहील.
— गणेश पोखरकर, अध्यक्ष, फळ, भाजीपाला विक्रेता संघ.
Comments are closed.