ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानचे मंत्री भारतात आले आहेत

‘एससीओ’ परिषदेच्या निमित्ताने शिष्टमंडळासह दाखल

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

ऑपरेशन सिंदूरनंतर प्रथमच शुक्रवारी पाकिस्तानचे एक मंत्री भारतात दाखल झाले. पाकिस्तानचे हवामान बदल आणि पर्यावरण समन्वय मंत्री मुसादिक मसूद मलिक दिल्लीत आयोजित शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) सभ्यता संवाद मंचावर सहभागी झाले. त्यांनी पाकिस्तानी शिष्टमंडळाचे नेतृत्व केले. भारताने त्यांचे राजकीय शिष्टाचारानुसार योग्यप्रकारे स्वागत केले आहे. मे 2023 मध्ये तत्कालीन परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांच्या दौऱ्यानंतर एखाद्या पाकिस्तानी केंद्रीय मंत्र्यांचा हा पहिला भारत दौरा ठरला आहे. बिलावल यांनी 2023 मध्ये एससीओ परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीच्या निमित्ताने भारत दौरा केला होता.

पंतप्रधान मोदी यांनी शुक्रवारी सायंकाळी 5:30 च्या सुमारास दिल्लीतील पुराना किल्ला येथे ‘एससीओ’ परिषदेचे उद्घाटन केले. त्यानंतर पंतप्रधानांनी उपस्थितांना संबोधितही केले. हा कार्यक्रम 20 ते 22 नोव्हेंबर दरम्यान वेगवेगळ्या सत्रांमध्ये चालणार आहे. भारतीय सांस्कृतिक मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालयाने संयुक्तपणे याचे आयोजन केले आहे. भारताने ‘एससीओ’ परिषदेसाठी 25 देशांना आमंत्रित केले होते, त्यापैकी 15 देशांनी आपला सहभाग निश्चित केला होता. सदस्य देशांची सामायिक सभ्यता आणि संस्कृती अधोरेखित करणे आणि त्यांच्यात परस्पर संवादाला प्रोत्साहन देणे हा याचा उद्देश आहे. भारताला ‘एससीओ’ केवळ एक राजकीय आणि आर्थिक मंच न राहता, सामायिक सभ्यता आणि मानवी मूल्यांवर संवादासाठी एक व्यासपीठ बनावे असे वाटते. यामुळे देशांमध्ये आणि त्यांच्या लोकांमध्ये चांगले संबंध आणि परस्पर सामंजस्य निर्माण होण्यास मदत होणार आहे.

पाकिस्तानतर्फे सांस्कृतिक मंत्र्यांऐवजी जलवायु मंत्र्यांना संधी

भारताने पाकिस्तानचे राष्ट्रीय वारसा आणि संस्कृती मंत्री औरंगजेब खान खिची यांना या फोरममध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले होते. तथापि, पाकिस्तानने जलवायु आणि पर्यावरण समन्वयमंत्री डॉ. मुसादिक मसूद मलिक यांना शिष्टमंडळाचे नेतृत्व करण्यासाठी नामनिर्देशित केले. पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, त्यांचे शिष्टमंडळ फोरमच्या विविध विषयांवरील चर्चेत सहभागी होण्यासोबतच इतर एससीओ सदस्य देशांच्या प्रतिनिधींशी स्वतंत्र चर्चा करणार आहेत.

चीन, इराणसह अनेक देश सहभागी

एससीओ परिषदेसाठी भारताने 25 देशांना निमंत्रणे पाठवली आहेत. यामध्ये चीन, कझाकिस्तान, इराण, किर्गिझ प्रजासत्ताक, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, बेलारूस, अझरबैजान, आर्मेनिया, बहरीन, नेपाळ, सौदी अरेबिया, कंबोडिया, तुर्की आणि श्रीलंका यांचा समावेश आहे. यापैकी बहुतेक देशांचे नेते आपापल्या शिष्टमंडळांसमवेत भारतात दाखल झाले असून ते विविध मंचांवर उपस्थित राहून चर्चेत सहभागी होतील.

Comments are closed.