दोन तरुणांच्या कार रेसने घेतला निष्पाप दाम्पत्याचा बळी! भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; पतीचा जागीच मृत्यू, पत्नीने रुग्णालयाच्या वाटेवर सोडला प्राण

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

दोन तरुणांमध्ये सुरू असलेल्या कार रेसने एका निष्पाप दाम्पत्याचा बळी घेतल्याची हृदयद्रावक घटना गेवराई रोडवरील पेट्रोल पंपासमोर घडली. भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने पतीचा जागीच मृत्यू झाला, तर पत्नीने रुग्णालयाच्या वाटेवर प्राण सोडला. शुक्रवारी दुपारी चार वाजता हा भीषण अपघात घडला.

मंगरूळ येथील प्रल्हाद गायकवाड (५५) आणि त्यांच्या पत्नी सुनीता हे दोघे वर्षश्राद्धाच्या कार्यक्रमासाठी नातलगाकडे गेले होते. कार्यक्रम आटोपून गावाकडे परतताना त्यांनी गेवराई रोडवरील डक पेट्रोलपंपावर दुचाकीत पेट्रोल भरले. रस्त्यावर वाहनांची वर्दळ असल्यामुळे ते रस्त्याच्या कडेला थांबले.

याचवेळी माजलगावहून येणाऱ्या भरधाव क्रेटा कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की, दुचाकीसह प्रल्हाद गायकवाड हे कारसोबत फरफटत गेले. या अपघातात प्रल्हाद गायकवाड यांचा जागीच मृत्यू झाला. तर पत्नी सुनीता या गंभीर जखमी झाल्या. पुढील उपचारासाठी त्यांना छत्रपती संभाजीनगर येथे नेत असताना गेवराईजवळ त्यांची प्राणज्योत मालवली.

कोण पुढे जाणार या नादात दोन जिवांचा बळी?

यासंदर्भात समोर आलेल्या माहितीनुसार क्रेटा आणि इनोव्हा या दोन कारमधील तरुणांमध्ये एकमेकांच्या पुढे जाण्याची रेस सुरू होती. बेदरकार वाहन चालवण्याच्या जीवघेण्या रेसमध्ये रस्त्याच्या कडेला थांबलेल्या गायकवाड दाम्पत्याचा हकनाक बळी गेला. विशेष म्हणजे या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. दुचाकीला धडक देणाऱ्या क्रेटा कारचा क्रमांक एमएच ४४ बी ५१४१ असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.

Comments are closed.